सांगली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर चौफेर टीका केली होती. ही टीका भाजपाला चांगलीच झोंबली असून, भाजपाकडून राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी सांगली येथील पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. भाजपा समाजात तेढ वाढवत असून, 2019 च्या निवडणुकीपूर्वी भाजपाकडून जातीय दंगली घडवल्या जातील, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला होता. दरम्यान, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी राज ठाकरे यांच्या भाषणाविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्यांच्या भाषणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी पोलिसांना आणि सरकारकडे द्यावेत, असे केळकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान पोलिसांनी ही तक्रार स्वीकारली आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यासमोर मनसे नेते राज ठाकरे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे . यावेळी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, उषा गायकवाड, धनपाल खोत, श्रीकांत वाघमोडे, दरीबा बंडगर, दीपक माने, योगेश जाधव, श्रीकांत शिंदे आदींसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवरील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. देशातील आणि राज्यातील भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. लोकांना सांगण्यासारखे यांच्याकडे काही उरले नाही. त्यामुळे २०१९ साली निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुस्लीम धार्मिक दंगली घडविण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात राम मंदिर प्रश्नावर सुनावणी सुरू आहे. २०१९च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच ही सुनावणी पुढे सरकेल, याची व्यवस्था भाजपाकडून केली जात आहे. निवडणुकांच्या तोंडावर बरोबर हे घडेल. राम मंदिराचा विषय घडला की, ताबडतोब दंगली घडवा, अशी चर्चादेखील या मंडळींनी काही मुस्लीम संघटनांशी केल्याचा गंभीर आरोप, राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान केला होता.
राज ठाकरेंची टीका भाजपाला झोंबली, पोलिसात दाखल केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 10:49 PM