ठाणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेश निवडणुकीत केलेल्या एका विधानावरून ठाकरे बंधूंचे सूर जुळल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपाच्या प्रचारावेळी शाह यांनी केलेल्या विधानावरून टोले लगावले. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आचारसंहितेच्या नियमावलीत काही बदल केलेत का याबाबत विचारणा केली आहे.
ठाण्यात आज मनसे कार्यकर्त्यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी अमित शाह यांच्या मोफत राम दर्शनाच्या विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, शाह यांनी टूर अँड ट्रॅव्हल्स नावाचं नवीन खाते उघडले असावे. तुम्ही काय कामे केली त्यावर निवडणूक लढवा. राम मंदिर दर्शनाचे आमिष का दाखवताय? इतकी वर्ष तुम्ही तिथे सत्तेत आहात तुम्ही काय केले हे लोकांसमोर येणे गरजेचे आहे. तसेच साहेबने बोला है हरने को...असं उदाहरण देत निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
तर गर्व से कहो हम हिंदू है हा नारा बाळासाहेबांनी बुलंद केला, हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून ६ वर्ष मतदानाचा अधिकार काढण्यात आला होता. आज निवडणूक आयोगानं आचारसंहितेत बदल केले असावेत. पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री धर्म, देवाच्या नावावर मते मागत असतील तर कदाचित निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केला असावा. जर बदल केला असेल तर सर्व राजकीय पक्षांना ते अवगत करावे. अमित शाह मध्यप्रदेशात जे भाजपाला मतदान करतील त्यांना रामलल्लांचे दर्शन मोफत घडवू असं म्हटलं, त्यांनी केवळ मध्य प्रदेशापुरते मर्यादित न राहता देशभरात रामभक्तांना जेव्हा वाटेल तेव्हा भाजपाकडून मोफत दर्शन घडवावं असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
काय म्हणाले अमित शाह?
मध्य प्रदेशात निवडणुकीचा प्रचार करताना अमित शाह म्हणाले की, तुम्ही ३ डिसेंबरला राज्यात भाजपाचं सरकार बनवा, भाजपाकडून मध्य प्रदेश सरकार तुम्हाला प्रभू रामाचे दर्शन मोफत घडवेल असं आश्वासन देत काँग्रेसनं ७० वर्ष राम मंदिर लटकवलं, वारंवार टाळाटाळ केली. परंतु पंतप्रधान मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन केले आणि आज मंदिर निर्माणही पूर्ण झाले असं शाह यांनी म्हटलं होते.