स्नेहा पावसकर,
ठाणे- दहीहंडीच्या उंचीबाबत न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देऊन ठाणे मनसेने ९ थरांची दहीहंडी लावण्याचा निर्धार पक्का केला असून हा थरांचा थरथराट अनुभवायला मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात येणार असल्याचे संकेत मनसैनिकांकडून मिळत आहेत. ठाणे महापालिकेच्या निवडणुकांवर डोळा ठेवून राज हे निवडणूक प्रचाराची हंडी फोडणार असल्याची कुजबूज आहे.बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीबाबत दिलेल्या निर्णयावर गुरुवारी राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करताच सायंकाळी ठाणे मनसेने ९ थरांची हंडी आणि ११ लाखांचे बक्षीस जाहीर केले. मनसेने ९ थर लावून हंडी फोडण्याची घोषणा केल्याने आतापर्यंत ठाणे-मुंबईतील सुमारे ११५ गोविंदा पथकांनी त्यांच्याशी संपर्क साधून नावनोंदणी केली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक पथके मुंबईतील असून ठाण्यातील २२ ते २३ पथके आहेत. ज्या पथकांचा ९ थरांचा उत्तम सराव झाला आहे, अशा मुंबईतील दोन पथकांना मनसेने विशेष निमंत्रण दिले आहे. थरांच्या स्पर्धेतील बक्षीस मिळवण्यासाठी उगाच इतर पथकांना साहस करण्याची संधी आम्ही देणार नाही. मात्र, शक्य तितके थर लावणाऱ्या प्रत्येक पथकाला बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती ठाणे मनसेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. ९ थर लावणाऱ्यांमध्ये ठाण्यातील गोविंदा पथके नसली तरी ठाण्यातील ४ मोठ्या गोविंदा पथकांचा आठ थरांचा सराव झाला असून त्यांच्याकडून तेवढे थर लावण्याची अपेक्षा आहे. विष्णूनगर येथील भगवती मैदानात पारंपरिक पद्धतीने ढोलताशांच्या गजरात साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी व ९ थर लागलेले पाहण्याकरिता राज ठाकरे यांना ठाणे मनसेने आमंत्रण दिले असून हंडीच्या दिवशीही त्यांचा उत्साह वाढवायला ते ठाण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. >निवडणुकांवर ठेवून लक्ष; हंडीला केले लक्ष्यमुंबई, ठाणे येथील महापालिका निवडणुका जवळ येत असून ठाण्यात शिवसेनेचे नेते दहीहंड्या लावतात. न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वप्रथम राज यांनी आवाज उठवला व त्यानंतर शिवसेनेने मुखपत्रातून निर्णयाचा समाचार घेतला. दहीहंडीवरील निर्बंधांना हिंदूंच्या सणावरील टाच असा रंग राज यांनी दिला असून हाच मुद्दा निवडणुकीचा व राजकारणाचा मुद्दा म्हणून वापरण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे मनसेने ठाण्यातील दहीहंडीकरिता आपली सर्व ताकद पणाला लावली आहे.