Raj Thackeray Ashish Shelar Meeting, Ainash Jadhav: आता सुरू असलेलं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले. तेव्हापासून कधीही लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील असे बोलले जात आहे. असे असताना केंद्रीय आणि राज्य पातळीवर विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मग उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाजपाने सोबत घेतले. त्यानंतर आता मनसेलाही सोबत घेण्यास भाजपा उत्सुक असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. आशिष शेलार हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊन राज ठाकरेंना भेटल्याचे सांगण्यात आले. पण शेलार किंवा ठाकरे दोघांनीही याबाबत अधिकृत भाष्य केले नाही. असे असले तरी मनसेचे ठाण्यातील नेते अविनाश जाधव यांनी याविषयी भाष्य केले.
"लोकसभेच्या दृष्टीने आमचे जे कार्यक्रम सुरू आहेत ते 'एकला चलो रे' या नाऱ्याने सुरू आहे. लोकसभेच्या दृष्टीने आमच्या बैठका सुरू आहेत. जे काही आहे ते स्वबळाच्या तयारीने सुरू केले आहे. पण युतीच्या बाबतीत सर्व निर्णय राज ठाकरेंचा असतो. राज ठाकरे जो निर्णय घेतील, त्या मार्गाने आम्ही काम करू. लोकसभेच्या दृष्टीने ज्या सभा होतील, त्या संपूर्ण महाराष्ट्रभर होतील यात वाद नाही. शेलारांशी भेटीत काय घडले याबाबतीत मला फार कमी माहिती आहे. परंतु आशिष शेलार अनेकदा राज ठाकरे यांची भेट घ्यायला येतात. बंगल्याच्या आत काय चर्चा झाली? ते उद्या राज ठाकरेंसोबत बैठक झाल्यानंतरच आम्हाला कळेल. युती आघाडीचे जे काही निर्णय आहेत, ते राज ठाकरेच घेतील," असे अविनाश जाधव म्हणाले.
"मुख्यमंत्री यांना राज ठाकरे भेटतात आणि मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटण्याकरिता जातात. ही बाब जनहिताची आहे. शिक्षकांचा विषय आहे की, दहावी बारावी मधील मुलांच्या परीक्षेची वेळ आली आहे. शिक्षकांना काढून तुम्ही निवडणुकीच्या कामाला लावलं आहे. नववी, दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे वर्ष आहे. मुलांनी परीक्षा द्यायची कशी आणि त्यांना शिकवणार कोण? हा मोठा प्रश्न आहे. जनहिताच्या प्रश्नांसाठी ते मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. उद्याची आमची महत्त्वाची बैठक आहे. लोकसभेच्या दृष्टीने आमच्या मागील दोन महिन्यांपासून बैठका सुरू आहेत," अशी माहितीही त्यांनी दिली.