मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे हे दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर नव्या वास्तूमध्ये राहण्यास गेले आहेत. कृष्णकुंजच्या शेजारीच राज ठाकरेंचे नवे निवासस्थान बांधण्यात आले आहे. शुक्रवारी पाडव्या दिवशी गृहप्रवेश झाल्यानंतर आता राज ठाकरेंचा पत्ता बदलला असून, राज ठाकरेंच्या नव्या निवास्थानाचे नामकरणही झाले आहे. शिवतीर्थ असे या नव्या वास्तूचे नामकरण करण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षे राज ठाकरे आणि कृष्णकुंज हे समिकरण बनले होते. मनसेच्या अनेक महत्त्वाचे निर्णय हे कृष्णकुंजवरूनच होत असतं. तसेच अनेक विषयांवर राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांप्रमााणेच विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि सर्वसामान्य कृष्णकुंजवरच धाव घेत असत. मात्र आता राज ठाकरेंच्या नव्या निवासस्थानामधूनच यासंदर्भातील निर्णय होणार आहेत. दादर येथील 'कृष्णकुंज'शेजारीच ही नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे.
शुक्रवारी पाडव्याच्या मुहुर्तावर राज ठाकरे यांनी या नव्या वास्तूमध्ये प्रवेश केला. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पूजन केले. राज ठाकरेंचे नवे निवासस्थान सर्व सोईसुविधांनी युक्त आहे. तसेच येथेच मनसेचे मुख्य कार्यालय असेल. त्याबरोबरच एक ग्रंथालयही येथे असेल. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर ठाकरे कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था असेल.
शुक्रवारी राज ठाकरेंच्या नुतन वास्तूचा गृहप्रवेश झाल्यावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ निवासस्थानी मनसैनिकांनी गर्दी केली होती. मात्र राज ठाकरेंनी नव्या वास्तूचे नामकरण शिवतीर्थ असे केल्याने येत्या काळात हे नाव शिवसेनेसाठी अडचणीचे ठरू शकते.