मुंबई – मशिदीवरील अनाधिकृत भोंगे उतरवलेत पाहिजे, अन्यथा जिथं भोंग्यावरून अजान वाजवली जाईल तिथे हनुमान चालीसा वाजता असं आवाहन देशभरातील हिंदुंना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत मनसे कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी हनुमान चालीसा वाजवली. राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली आहे. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे.
राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत एका मराठी युवकाने थेट अमेरिकेत पहाटेच्यावेळी हनुमान चालीसा लावली. याचा व्हिडीओ त्याने पोस्ट करत म्हटलं की, आज इतक्या वर्षांनी हिंदुह्द्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बहुप्रतिक्षित स्वप्न साकार होत आहे. हिंदुस्थानात हनुमान चालीसेचा गजर होतोय. जे मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना माझा पाठिंबा आहे. राज ठाकरे(Raj Thackeray) आगे बढो, पुरा हिंदुस्थान आपके साथ है अशा शब्दात त्याने जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली आहे.
मुस्लीम बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपली
४ मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावण्यासाठी तयारी केली होती. राज्यातील अनेक भागात हनुमान चालीसा लावण्यात आली. परंतु पनवेल, मुंब्रा, वांद्रे, भिवंडी, माहिम याठिकाणी पहाटेची अजान भोंग्याविना झाली नाही. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा लावली नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत बऱ्याच ठिकाणी भोंग्याविना अजान झाली. मनसे कार्यकर्ते गनिमी काव्याने हनुमान चालीसा लावणार होते. मात्र भोंग्याविना अजान झाल्याने मनसे कार्यकर्त्यांनीही राज ठाकरेंच्या आदेशाचं पालन केले. वांद्रे येथील जामा मशीद, मुंब्रा येथील दारुफाला मशिदीतही बांग देण्यात आली नाही. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांचे मनसेने आभार मानले.
त्या' मशिदींच्या परिसरात कोणालाही त्रास होता कामा नये
सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी, असं आवाहन राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले होते.