Uddhav Thackeray Raj Thackeray News: 'बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना निवडणूक चिन्हासकट शिंदेंकडे गेली. आज उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय आणि फक्त खान उरले आहेत', अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं. वर्सोव्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार हारून खान यांच्या उमेदवारीवरही राज ठाकरेंनी टीका केली.
दिंडोशी विधानभा मतदारसंघात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारासाठी प्रचारसभा झाली. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वावरून लक्ष्य केले.
"उद्धव ठाकरेंचा बाण गेलाय, खान उरले"
"गेल्या पाच वर्षातील सगळा गोंधळ तुम्ही पाहिलेला आहे. काय गोष्टी झाल्या, काय गोष्टी घडल्या? कोण कुठे गेलं, कोण कुणाबरोबर गेलं? कुठंपर्यंत गेलं प्रकरण? हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही आज गेली एकनाथ शिंदेंकडे. निवडणूक चिन्हासकट. मला अजूनही आठवतंय मी मराठवाड्यामध्ये एक स्लोगन (घोषणा) चालायचं की, 'बाण हवा का खान?' दुर्दैव असं की आज उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय, उरलेत फक्त खान", अशा शब्दात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले.
राज ठाकरे यांची हारून खान यांच्या उमेदवारीवरून टीका
"वर्सोव्यामध्ये त्यांनी उमेदवार कोण दिलाय, हारून खान. शिवसेनेचा उमेदवार हारून खान. ज्याच्या नावातच हारून आहे, तो विजयी कसा होईल? इथपर्यंत तुमची वेळ गेली. म्हणजे कडवट हिंदुत्ववादीपासून ते मुसलमानांसमोर लाचार होणाऱ्यांपर्यंत... इथपर्यंत तुमची मजल गेली. हे उबाठा शिवसेनेचे उमेदवार त्यांचं पत्रक काढताहेत उर्दूमध्ये. काय पातळीला आले ते बघा", अशी टीका राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केली.
"मध्यतंरी मी मनसेच्या जाहिराती दिल्या होत्या वर्तमानपत्रामध्ये. मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावरही मराठीमध्ये जाहिरात टाकली होती. इंग्रजी वर्तमानपत्र म्हणून इंग्रजीत नाही, मराठी जाहिरात टाकली. अमराठी लोकांना मराठी वाचता येतं. त्यांना मराठी समजतं. आपल्यालाच वाटतं की, त्यांना मराठी कळत नाही, समजत नाही", असे राज ठाकरे म्हणाले.