मविआमधील जागावाटप वंचितमुळे अडलेले असताना महायुतीतील जागावाटपही तिढ्यात अडकले आहे. आधीच शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात जास्तीतजास्त जागा वाटून घेताना दमछाक झालेली असताना आता चौथा भिडू येत आहे. राज ठाकरे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेलेले असताना आता इकडे मुंबईत सागर बंगल्यावर फडणवीस-अजित पवारांमध्ये बैठक सुरु झाली आहे.
महायुतीतील जागांचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. राज ठाकरे सोबत आल्यास त्यांना किमान दोन जागा सोडाव्या लागण्याची शक्यता आहे. या जागा शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या असणार आहेत. दक्षिण मुंबईतील मतदारसंघाची चर्चा होत आहे. अशातच आधी मुळ तीन पक्षांचाच तिढा सुटलेला नसताना आता चौथ्या पक्षामुळे युतीत पुन्हा जागावाटपाचे गुऱ्हाळ सुरु झाले आहे.
फडणवीस, बावनकुळे काल राज ठाकरेंसोबत दिल्लीला गेले होते. परंतु रात्रीच ते माघारी परतले होते. तर राज ठाकरे दुपारी १२ वाजेपर्यंत दिल्लीत शाहंच्या कॉलची वाट पाहत थांबले होते. आता नुकतेच ते शाहांच्या भेटीला गेले आहेत. तर इकडे महाराष्ट्रात अजित पवार, आशिष शेलार, बावनकुळे हे फडणवीसांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या जागावाटपावर चर्चा झाली की अजित पवार दुपारी ४ वाजता दिल्लीला जायला निघणार आहेत.
दुसरीकडे शिवसेनेचे खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी जमू लागले आहेत. आता तीन पक्षांत ऐनवेळी चौथा येऊ घातल्याने पुन्हा जागावाटपासाठी घासाघिस करावी लागण्याची शक्यता आहे. भाजपाने आधीच २० जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामुळे उरलेल्या २८ मतदारसंघांचाच विचार करावा लागणार आहे.