मुंबई : राज्यभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीलामहायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. राज ठाकरे यांचा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय अगदी योग्य असून त्यांनी देशाच्या विकासाला महत्त्व दिले आहे. तसेच, राज ठाकरे हे अगदी मोकळ्या मनाचा माणूस असून ते कद्रू किंवा कोत्या मनोवृत्तीचे नाहीत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला त्यांचा वाटा मिळू शकतो, असे संकेतही दिले. आम्ही सगळे एकत्र आलो तर निवडणुकीत त्याचा फायदा होणारच आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देताना कोणतीही अट ठेवलेली नाही. आगामी विधानसभा आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेला काय द्यायचं, याचा विचार होऊ शकतो, आता काहीच ठरलेले नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
घरी बसणाऱ्यांना आणि फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना किंवा शिव्याशाप देणाऱ्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे होता का? असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचा विकास करत आहेत. त्यामुळेच राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला. राज ठाकरे यांनी मोदींना आणि महायुतीला पाठिंबा देण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य असून त्यांनी देशाच्या विकासाला महत्त्व दिले आहे. ते सत्तेबाहेर असले तरी लोकांना न्याय मिळावा आणि त्यांची कामं झाली पाहिजेत, ही त्यांची भावना आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
याचबरोबर, गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी मिलिंद नार्वेकर यांना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. मिलिंद नार्वेकर आणि माझा सध्या संपर्क नाही. मी त्यांना कुठलीही ऑफर दिलेली नाही. ते उबाठामध्ये आहेत, तिकडे त्यांना सुखी राहू दे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार असताना अभिनेत्री कंगना रणौत हिच्या घरावर मुंबई महापालिकेने कारवाई केली होती. यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. सत्तेचा दुरुपयोग, यंत्रणांचा दुरुपयोग हा त्यावेळेस होत होता. हनुमान चालिसा वाचणाऱ्यांना तुरुंगात टाकलं, अभिनेत्री कंगना रणौत हिचं घर तोडलं, अशी अनेक प्रकरणं आहे. सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि लोकांना नाहक त्रास द्यायचा, हे काम कोणी केलं? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.