Uddhav Thackeray Shivsena vs MNS: शिवसेनेतून बंड करून भाजपाशी हातमिळवणी केल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आधी शिवसेनेच्या ४० आमदारांनी, तसेच विविध मनपा आणि नगरपालिकांमधील आजी-माजी नगसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता. मात्र आता शिवसेनेच्या लोकसभेतील खासदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. शिंदे गटाने बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेच्या १४ खासदारांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांतून समोर आली आहे. यानंतर राज ठाकरे हे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका नेत्याने शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. याच ट्वीटमध्ये त्या नेत्याने दिपाली सय्यद आणि संजय राऊत यांनाही टोला लगावला आहे.
बंडखोर आमदारांच्या समर्थनासह एकनाथ शिंदे यांना आता शिवसेनेतील इतर फळीतूनही समर्थन मिळताना दिसत आहे. भाजपासोबत राज्यात सत्तास्थापना केल्यानंतर त्यांनी शिवसेनेला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. आमदार, माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्यापाठोपाठ आता खासदारही शिंदे गटात सामील होतात की काय अशी चर्चा आहे. यावर मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट केलं आहे. "आमदार गेले, नगरसेवक गेले आणि आज ऐकतोय तर काय खासदार ही गेले.. (१४ खासदार यांनी शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन हजेरी लावली) अरे नवाब सेनेबरोबर कोणी राहणार आहे की नाही? बहुतेक सय्यद बंडा आणि विश्व प्रवक्ते हे दोघेच मोठे नवाब, छोटे नवाब यांच्या बरोबर राहतील असं चित्र दिसतंय...", अशा शब्दांत त्यांनी शिवसेनेची आणि पर्यायाने ठाकरे गटाची खिल्ली उडवली.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या आमदारांच्या गटाने काही महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावली. या बैठकीला शिवसेनेच्या लोकसभेतील १९ पैकी १४ खासदारांनी हजेरी लावल्याचे वृत्त आहे. शिवसेनेचे १४ खासदार शिंदे गटाच्या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने हजर राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या खासदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, असा आग्रह धरला होता. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला होता. खासदारांची नाराजी थोपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. मात्र आता शिवसेनेच्या १४ खासदारांनी थेट शिंदे गटाच्या बैठकीला हजेरी लावल्याने उद्धव ठाकरे यांना अजून मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.