Ajit Pawar on PHD Controversy, MNS: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानामुळे चर्चेत आहे. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत अजित पवार यांनी एक विधान केले. सारथी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी पीएचडी करून दिवे लावणार आहेत का? असं वक्तव्य केलं होतं. त्या विधानावर आता तीव्र पडसाद आता उमटू लागले आहेत. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या विधानाचा समाचार घेण्यात आला आहे. एक भली मोठी पोस्ट ट्विट करत त्यांनी अजित पवारांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
मनसे अधिकृत या ट्विटर अकाऊंटवरून अजितदादांचा समाचार घेण्यात आला आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे, "उप-उपमुख्यमंत्री महोदय अजित दादा, पीएचडी करून काय दिवे लावणार आहेत असं आपण म्हणालात... दादा, महाराष्ट्र हे राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळं ठरतं ते शिक्षणाच्या संधींमुळे आणि त्याबद्दलची आस प्रचंड आहे म्हणूनच. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, ह्यांच्यासारख्या अनेकांमुळे महाराष्ट्रात शिक्षणाची कवाडं बहुजनांना खुली झाली. अगदी लोकमान्य टिळकांपासून ते गोपाळकृष्ण गोखलेंपर्यंत प्रत्येकांनी शैक्षणिक संस्था काढण्यावर भर दिला कारण शिक्षणच समाजाच पुनरुत्थान करू शकतं ह्याची जाणीव होती."
"राहिला प्रश्न पीएचडीचा तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः डॉक्टरेट होते आणि त्यांना सचोटीने, संघर्षाने मिळविलेला हा बहुमान हा महाराष्ट्रातील लाखो तरुणांना प्रेरित करतो की एखाद्या विषयात दीर्घ अभ्यास करून पारंगत होऊन, पीएचडी मिळवावी... आणि सारथी, महाज्योती, बार्टी ह्या संस्थांच्या शिष्यवृत्तीचा विषय होता म्हणजे बहुजनांची मुलं उच्चशिक्षित होणार ना... मग महाराष्ट्राचा उप-उपमुख्यमंत्री इतकं बेजबाबदार विधान आणि तेही सभागृहात करूच कसा शकतो ? "मी स्पष्टवक्ता, मी कठोर, मी टग्या..." असं स्वतःला म्हणवून घेतलं म्हणजे महाराष्ट्राने तुमची वाट्टेल ती विधान सहन करायची का?" असा संतप्त सवाल करण्यात आला आहे.
"तुम्ही स्वतःला टगे म्हणवून घेता.. कारण तुमची टगेगिरी खपवून घेणारी व्यवस्था तुमच्या पायाशी आली. पण तुमच्यासारखं नशीब प्रत्येकाचं कसं असणार ? म्हणून शिकून, पीएचडी करून, चांगली नोकरी करून, सचोटीने आयुष्य जगण्याची इच्छा बाळगत महाराष्ट्रातला तरुण-तरुणी राबत असतात... ते ज्ञानाचा दिवा लावत आहेत, त्यामुळे त्यांना तरी तुमच्या टगेगिरीचा प्रसाद देऊ नका. (तुमचं विधान) खेदजनक आणि तितकंच संतापजनक (आहे)," असे रोखठोक मत मनसेकडून व्यक्त करण्यात आले आहे.