मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधलाय. यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांच्या उचलबांगडीवरुन राज यांनी मोदींना लक्ष्य केलंय. राफेल विमान खरेदीतील भ्रष्टाचारासंदर्भातील कागदपत्रांची मागणी करणाऱ्या सीबीआय प्रमुख अलोक वर्मा यांची उचलबांगडी करण्यात आली. मात्र, मोदी सरकारने जाणीवपूर्वक सीबीआयमधील दोन अधिकाऱ्यांना अडकवल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावरच, राज यांनी हे व्यंगचित्र रेखाटून मोदींच्या वर्मावर बोट ठेवण्याचं काम केलंय.
राज यांनी मोदींच्या वर्मावर बोट ठेवून आपले कार्टुन रेखाटले आहे. या व्यंगचित्रात सीबीआय प्रमुख अलोक वर्मा दिसून येत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या हातात राफेल विमान खरेदीसंदर्भातील भ्रष्टाचाराचे पुरावे मागितल्याचा पेपर दिसतो. तर बाजुलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चित्र असून त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसून येत आहे. तसेच आत्ताच्या आता याला काढून टाका, असे आदेश मोदी देताना दिसत आहे. तर, अलोक वर्मा यांच्याकडून रिलायन्सचे मालक अनिल अंबानींच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे राज यांनी आपल्या व्यंगचित्रात दर्शवले आहे. कारण, मोदी सरकारने एचएएल कंपनीला डावलून अंबानींच्या रिलायन्सला राफेल विमान खरेदीचे कंत्राट दिले असून त्यामध्ये 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचेही राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून म्हटले आहे. राज यांचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.