अकाेला : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीचीच गरज आहे, त्यामुळे ते राज्यातील वीजबिलाच्या प्रश्नावर बेछुट आराेप करतात, असा टाेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे परिवार संवाद मेळाव्यासाठी रविवारी अकाेल्यात आले हाेते. यावेळी सकाळी त्यांनी जलसंपदा विभागाचा आढावा घेतला व नंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, वीजबिलाच्या प्रश्नावर राज्य सरकार गंभीर आहे. मात्र, एवढया महत्त्वाच्या विषयावर राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी अदानी आले अन् वीजबिलाचा प्रश्न मागे पडला, असे विधान करणे हास्यास्पद असल्याचे पाटील म्हणाले. सध्या राज ठाकरे यांना प्रसिद्धीची नितांत गरज आहे त्यामुळेच त्यांनी असे विधान केले आहे, असा टाेलाही त्यांनी लगावला. सध्या दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदाेलन हे आणखी तीव्र झाले असून, त्या आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठीच शनिवारी केलेला चक्का जाम यशस्वी झाल्याचा दावा त्यांनी केला. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशील नसल्याचा आराेपही त्यांनी केला. दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाबाबत बदललेल्या परिस्थितीत तिन्ही पक्ष चर्चा करून निर्णय घेतील, असं म्हणत पाटील यांनी अध्यक्षपदाबाबतचे गुढ आणखी वाढवले. यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, आमदार अमाेल मिटकरी, आमदार नितीन देशमुख आदी उपस्थित हाेेते.भाजप नेत्यांनी शहाणपणा शिकवू नये!इंधन दरवाढीवर केंद्राने कर कमी केल्यास दर नियंत्रणात येतील. केंद्र राज्याशी दुजाभाव करतं, अशावेळी भाजपच्या राज्यातील नेत्यांनी आम्हाला राज्याचे कर कमी करण्याचं शहाणपण शिकवू नये, असा टोला जयंत पाटील यांनी भाजपला लगावला. केंद्राने एक रूपया जरी कमी केला तर करात माेठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी सुनावले.‘फडणवीसांचे विधान गांभीर्याने घेत नाही’विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या राज्य सरकारमध्ये विनाशिडीचे फासे पलटवू, असे विधान केले हाेते. या संदर्भात जयंत पाटील यांना विचारले असता, फडणवीस यांना एक व्यक्ती म्हणून मी गांभीर्याने घेताे मात्र त्यांचे विधान गांभीर्याने घेत नाही, असा टाेला लगावला.
राज ठाकरेंचे 'ते' वक्तव्य प्रसिद्धीसाठीच- जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 6:18 AM