-मोसीन शेख
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली. त्यांची ही सभा सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला असून, पवारांच्या सभेचे फोटो चांगलेचं व्हायरल होत आहेत. मात्र मागील आठवड्यात राज्याचे लक्ष लागलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसाच्या खेळामुळे रद्द झाली होती. त्यामुळे पावसाचं टायमिंग राज ठाकरेंनी चुकवलं अन् पवारांनी साधलं, अशी चर्चा पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस असल्याने गेल्या दोन-तीन दिवसात राजकीय नेत्यांनी आपल्या सभांचा धडाकाच लावला आहे. मात्र परतीच्या पावसाचा फटका निवडणुकीच्या या प्रचारसभांनाही बसत असल्याचं दिसत आहे. शुक्रवारी शरद पावर यांची साताऱ्यात सभा सुरु असताना अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे एकच धावपळ सूर झाली होती. मात्र वरून धो-धो पाऊस सुरु असताना सुद्धा पवारांनी आपले भाषण सुरुचं ठेवले. पवार हे आपले भाषण आटोपतं घेतील आणि निघून जातील असे सर्वाना वाटत होते. मात्र पवारांनी आपलं झंजावती भाषण सुरूच ठेवले. भर पावसात भाषण केल्यामुळे शरद पवारांवर सोशल मीडियातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे.
मात्र दुसरीकडे आता यावरूनच राज ठाकरेंच्या पुण्यातील रद्द झालेली सभेची सुद्धा चर्चा पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज यांची पहिली सभा गेल्या आठवड्यात पुण्यात होणार होती. ईडीच्या चौकशीनंतर ते पहिल्यांदाचं जाहीर सभा घेत असल्याने, ते काय बोलणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. मात्र पावसाने हजेरी लावल्याने ही सभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राज यांच्या भाषणाकडे लक्ष लागलेल्या मनसे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असल्याचे पहायला मिळाले. त्यात शुक्रवारी पवारांची भर सभेत झालेली सभामुळे, पावसाचं टायमिंग राज ठाकरेंनी चुकवलं अन् पवारांनी साधलं असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान वयाच्या ७९ व्या वर्षीही शरद पवार हे निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीत देखील त्यांनी पाऊस कोसळत असताना पावसात भाषण केलं. त्यामुळे तरुण पिढी पवारांच्या पावसातील भाषणाची दाद देतेय. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात पवारांची ही सभा राष्ट्रवादीला नवसंजीवनी देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.