मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज 17 वा वर्धापनदिन आहे. ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन सभागृह येथे राज ठाकरेंनी सभेतून महाराष्ट्र सैनिकांना सतराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आणि मनसेच्या आतापर्यंतच्या विविध आंदोलनाबाबत माहिती देणारी पुस्तिका जारी केली.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, 'अनेकजण म्हणतात की, मनसे आंदोलन अर्धवट सोडते. मी त्यांना आव्हान देतो की, एकही आंदोलन अर्धवट सोडल्याचे त्यांनी दाखवून द्यावे. आम्ही कोणतेच आंदोलन अर्धवट सोडले नाही. आतापर्यं मनसेने जेवढी आंदोलने केली, तेवढी कोणत्याच पक्षाने केली नाहीत. आम्ही सत्तेत असताना नाशिकमध्ये जेवढं काम केलं, तेवढं कोणत्याच पक्षाने केलं नाही. पण, लोकांना मतदान करताना काय होतं, काही कळ नाही.'
'काही पत्रकार जाणूनबुजून पक्षाची बदनामी करतात'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
'मराठीच्या मुद्द्यावर आम्हीच राज्यात पहिलं आंदोलन केलं. सुरुवातीला मोबाईलमध्ये मराठीत टोन येत नव्हती. नंतर मनसैनिकांनी ठाण्यातील मोबाईल कंपनीचं ऑफीस फोडलं आणि दोनच दिवसांत मराठी टोन ऐकू येऊ लागली. आमच्यामुळे मराठी चित्रपटांना हक्काची चित्रपटगृह मिळू लागली. आमच्या आंदोलनामुळे दुकानांवरील पाट्याही मराठीत झाल्या.'
'मला कळत नाही, महाराष्ट्रात मराठी पाट्यासाठी, मोबाईलवरील टोनसाठी आणि चित्रपटगृहांसाठी आंदोलन करावं लागतं. दुसऱ्या राज्यात असं आंदोलन नाही करावं लागतं. याचे कारण म्हणजे, हे सगळे लोक तुम्हाला गृहीत धरत आहेत. आम्ही कामे करुनही आम्हाला प्रश्न विचारले जातात अन् सरकारला कुणीच काही विचारत नाही. राज्याच्या विकासाची ब्लू प्रिंट मांडणारा देशातला पहिला पक्ष मनसे आहे. आधी मला विचारायचे ब्लू प्रिंट कुठंय, ज्या दिवशी जाहीर केली, त्यानंतर कुणी विचारलं नाही. कारण, कुणी वाचलीच नाही,' असंही राज ठाकरे म्हणाले.