मुंबई: ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील पालिका निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पण, राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे, मनसेही यात मागे नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठीचा मुद्दा पुन्हा लावून धरण्याचे आदेश दिले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडायचा नाही, पण मराठीचा मुद्दाही जोरकसपणे मांडायचा. हिंदुत्वाबरोबरच मराठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे, अशा सूचना दिल्या आहेत. मराठीबाबत फक्त काही ठरावीक नेत्यांनी न बोलता सर्वांनीच त्यावर बोललं पाहिजे, अशा कानपिचक्याही राज यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या. येत्या निवडणुकीत मराठीच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि मनसे आमनेसामने येऊ शकते.
बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधला. 'बैठकीत दोन ते तीन विषयांवर चर्चा झाली. मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. महिलांनी या जयंतीत मोठ्या संख्येने भाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. स्वत: राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत', असं बाळा नांदगावकर म्हणाले.
गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा होणारकोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून गुढीपाडव्याचा मेळावा झाला नाही. पण, आता येत्या 2 एप्रिल रोजी हा मेळावा होणार आहे. हा मेळावा सुद्धा उत्साहात साजरा करायचा आहे. या संदर्भात काही सूचना देण्यात आल्या आहेत, असंही नांदगावकर यांनी सांगितले. तसेच, निवडणुका कधी होतील? माहीत नाही. पण निवडणुका होऊ शकतात हे गृहीत धरून निवडणुकांची तयारी पूर्णपणे ताकदीने करायची आहे, अशा सूचना देण्यात आल्याये त्यांनी सांगितले.