मुंबई:मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने लोक येतात. राज नेहमीच आपल्या भाषणातून कठोर भूमिका घेताना दिसतात. त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच परिचीत आहे. पण, राज ठाकरेंनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कुठल्याही सभेच्या भाषणापूर्वी राज ठाकरेंना भिती वाटते, घाम फुटतो, अशी माहिती स्वतः राज यांनी दिली आहे. ते एबीपी माझा वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
राज सभेपूर्वी वाचन करतात...या कार्यक्रमात राज यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यादेखील आल्या होत्या. यावेळी त्यांना विचारण्यात आले की, सभेपूर्वी तुम्ही तयारी कशी करता? त्यावर आधी शर्मीला ठाकरे म्हणाल्या की, ''राज प्रचंड अभ्यासू आहेत. कुठल्याही सभेपूर्वी ते आपल्या खोलीत एकटे बसतात आणि वाचन करतात. ते वाचत असताना कुणीही त्यांच्या जवळ जात नाही. राज ठाकरे कधीच वाचून भाषण करत नाहीत, त्यामुळे ते भाषणापूर्वी प्रचंड वाचन करतात,'' अशी माहिती शर्मीला यांनी दिली.
'मला सभेपूर्वी खाम फुटतो'यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ''लोकांना विश्वास बसणार नाही, पण मला सभेपूर्वी भिती वाटते. माझ्या हाता-पायाला घाम फुटतो. याचे कारण म्हणजे, मलाच माहित नसते मी सभेत नेमकं काय बोलणार आहे. मी सभेपूर्वी अभ्यास करतो, वाचन करतो. पण, सभा सुरू झाली की, वेगवेगळे मुद्दे आपोआप येतात.''
माझ्या भाषणाची स्टाईल वेगळीते पुढे म्हणाले की, ''तुम्ही माझी सगळी भाषणे पाहा, मी कधीच एका लयीत बोलत नाही. माझी भाषणे कधीच सरळ नसतात. मी कधी हा मुद्दा घेतो तर कधी दुसराच मुद्दा घेतो. मी ऐनवेळी कुठला मुद्दा बोलेल, हे मलादेखील माहित नसते. कधीकधी महत्वाचा मुद्दा बोलायचा राहून जातो आणि भलताच मुद्दा येतो. नंतर माझे सहकारी मला येऊन सांगातात, की हा मुद्दा राहिला म्हणून," अशी माहिती राज यांनी यावेळी दिली.