मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची येत्या ६ मे रोजी रत्नागिरीमध्ये सभा होत आहे. ही सभा मनसेनेरत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या जवाहर मैदानावर घेण्याचे ठरविले होते. सभा स्थळाचे नावही जाहीर केले होते, परंतू आज जेव्हा मनसेचे पदाधिकारी शिक्षण संस्थेकडे विचारणा करण्यास गेले असता त्यांना नकार मिळाला. यामुळे सभेचा दिवस जवळ आलेला असताना मनसेची कोंडी झाली आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण संस्थेला न विचारताच मैदानावर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. परंतू, आज जेव्हा मनसेचे पदाधिकारी संस्थेत पोहोचले तेव्हा संस्थेने गेल्या १० वर्षांपासून आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला सभेसाठी मैदान दिलेले नाही. यामुळे या सभेलाही मैदान दिले जाणार नाही असे सांगितले.
यामुळे आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानाच्या विषयावरून बैठक बोलावली आहे. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीवर भाजपचे वर्चस्व असले तरी देखील या संस्थेने कोणत्याही राजकीय पक्षांना मैदान न देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अन्य नेत्यांच्या सभा, कार्यक्रम दुसऱ्या मैदानांवर घेतल्या जातात. यामुळे मनसेकडे आता त्या मैदानांचा पर्याय उपलब्ध आहे.