मुंबई - Neelam Gorhe on Raj Thackeray ( Marathi News ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीत सहभागी होणार यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर आज राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली. यावरून विरोधकांनी टीका सुरू केली. त्यावरून शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी उघडपणे अमित शाहांची भेट घेतली, काही जण गुपचूप भेटी घेतात असं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईत पत्रकारांशी गोऱ्हे यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. यातून अनेकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंच्या भेटी झाल्या आहेत. राज ठाकरेंनी नेहमीच सरकारला सकारात्मक सल्ला देण्याचं काम केलंय. काही सरकारने त्यांना सन्मान दिला. काहींनी त्यांचे ऐकलं नाही. या पार्श्वभूमीवर ही भावनिक, सामाजिक आणि राजकीय भेट आहे. त्याच्यातून आत्ताच कुठलाच निष्कर्ष काढणे शक्य नाही. परंतु बेरजेचे राजकारण जो शब्द यशवंतराव चव्हाणांनी तयार केला. काही लोकांचे राजकारण उण्याचे असते. कुणाला तरी उतरवून, काढून टाकू असं असतं. त्यात महाराष्ट्राचे हित नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच राजकारण संवाद, समन्वय, सहकार्य आणि मुद्द्यांवर एकजूट आवश्यक असते. राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या प्रश्नासाठी कायमच आग्रहाची भूमिका घेतली पाहिजे. अमित शाह यांच्यासोबत राज ठाकरेंनी उघडपणे भेट घेतली आहे. काहीजण गुपचूप भेटी घेतात. राजकारणात कुणी कुणाला भेटू शकते. राजकारणाचा तो पाया आहे. राज ठाकरेंशी संवाद आणि त्यातून महाराष्ट्रासाठी काही चांगले झाले तर त्याचे मी स्वागतच करते असंही नीलम गोऱ्हे यांनी राज ठाकरेंच्या महायुतीतील सहभागावर प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, लोकसभेची निवडणूक जाहीर झालीय. बाळासाहेब ठाकरे यांचा ज्या मुद्द्यांवर भर होता ते म्हणजे रामजन्मभूमी, कलम ३७० हटवणे त्याचसोबत काश्मीरमध्ये लाल चौकात तिरंगा उभारला पाहिजे हे सगळं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून झालेले आहे. आज बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांकडून सुरू आहे. बाळासाहेबांच्या विचारांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न शिंदे करतायेत असं गोऱ्हे यांनी म्हटलं.
...पण त्यांचे भूत लवकरच उतरेल
शिवसेनेची पहिली यादी दिल्लीत भाजपा हायकमांडकडे पाठवली आहे अशी सूत्रांच्या हवाल्याने बातमी येते असा प्रश्न नीलम गोऱ्हेंना पत्रकारांनी विचारला असता त्यावर सूत्रांनुसार ज्या बातम्या दिल्या जातात त्या तपासून पाहायला हव्यात. कारण काही वेळा ही सूत्रे असंतुष्ट आत्मे असतात. तो असंतुष्ट आत्मा काहीतरी बडबड असेल. पण त्याचे भूत लवकरच उतरेल असा खोचक टोला लगावला आहे.