मुंबई - शिवराय आणि शिवचरित्रासाठी आपले जीवन वेचणारे प्रसिद्ध शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काल पहाटे निधन झाले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही काल एक भावपूर्ण पोस्ट लिहून बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या खास व्यंगचित्राच्या माध्यमातून बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहणारे व्यंगचित्र शेअर केले आहे. या व्यंगचित्रामध्ये बाबासाहेब पुरंदरे हे स्वर्गात प्रवेश करताना दिसत असून, सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज ‘ये रे माझ्या गड्या, मल शोधण्यासाठी जगभर खूप पायपीट केलीस. अविश्रांत मेहनत घेतलीस. माझ्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंस, ये आता आराम कर', असे सांगत स्वागत करत असल्याचे दिसत आहेत.
दरम्यान, काल बाबासाहेब पुरंदरेंचे निधन झाल्याची बातमी कळताच मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुण्याकडे येण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी पुण्यातील पुरंदरेवाड्यात जाऊन बाबासाहेब पुरंदरेंच्या पार्थिवाला पुष्पहार घालून अंत्यदर्शन घेतले. तसेच ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला होता.
त्यात राज ठाकरे म्हणाले होते की, बाबासाहेबांनी आपलं आयुष्य शिवचरित्र सांगण्यासाठी खर्च केलं. परंतु असं असतानादेखील वर्तमानातील प्रश्न आणि भविष्यातील आव्हानं याबाबात त्यांच्याकडून कायम मार्गदर्शन होत आलं. माझ्या व्यक्तिगत आयुष्यात ते मार्गदर्शक तर होतेच, परंतु मला पितृतुल्यही होते, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. बाबासाहेब मला नेहमी सांगत, महाराजांचा जिथे-जिथे पदस्पर्श झाला, तिथे- तिथे मी आजपर्यंत अनेकदा जाऊन आलो आहे. आता फक्त एकच जागा उरली आहे, महाराज जिथे गेले तिकडे जायची. शिवछत्रपती महाराजांचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला, असं म्हणत राज ठाकरे यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.