मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत. दुसरीकडे, भेटीगाठी आणि फोडाफोडीच्या राजकरणामुळे राजकीय वातावरण तापत आहे. त्यातच , लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सुमारे पाऊण तास चालेल्या या भेटीत राजकीय विषयावर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या तयारीला लागले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
निवडणुकीतल्या पराभवानंतर मंगळवारी महाआघाडीची मंथन बैठक झाली. यावेळी राज ठाकरेंबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा झाली. यावेळी, मनसेला काँग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या आघाडीत घेण्यावरून सुद्धा चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी जाऊन राज यांनी पवारांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत चर्चा झाली असून राज्यातील राजकीय परिस्थिती बाबत सुद्धा चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे.
राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. तेव्हापासूनर शरद पवार आणि राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे. त्यानंतर, निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यातच, कालच्या आघडीच्या मंथन बैठकीत राज यांना सोबत घेण्याची चर्चा झाली.त्यामुळे विधानसभा निवडणूकीत मनसेला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भाजप-शिवसेना युतीला सामोरं जाते का हे पाहणं महत्त्वाचं आहे.