औरंगाबाद – शहरात मनसे प्रमुख राज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांच्या सभेनंतर आता १९८८ मध्ये झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेशी तुलना केली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा वारसा राज ठाकरेच पुढे घेऊन जातील असं मनसेकडून सांगण्यात येत आहे. राज ठाकरेंची सभा ज्या मैदानावर झाली. तिथेच बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांनी १९८८ मध्ये सभा घेतली होती. या सभेनंतर शिवसेनेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर हळूहळू शिवसेनेचा मराठवाड्यात विस्तार झाल्याचं दिसून आले.
राज ठाकरेंनी घेतलेल्या सभास्थळी शेजारील असणाऱ्या एका फ्लॅटमध्ये जोशी कुटुंब राहतं. या फ्लॅटमधून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा बघितली होती. ग्राऊंडसोबत तिन्ही रोड प्रचंड गर्दी होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेची गर्दी होती त्यापेक्षा २ टक्के गर्दी राज ठाकरेंच्या सभेत कमी पाहायला मिळाली. ९८ टक्के गर्दीने राज ठाकरेंची सभा भरली होती. त्याकाळी जसा जल्लोष,उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होता तोच आजही पाहायला मिळाला. असं कुटुंबाने सांगितले. पण या गर्दीत जास्तीत जास्त तरूण पाहायला मिळाले. परंतु बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे हिंदुत्वाचे आणि लोकांच्या मनातले होते असंही कुटुंबाने सांगितले.
काय म्हणाले राज ठाकरे?
मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील विराट सभेत बोलताना राज यांनी औरंगाबादेतच नाही तर मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात, नंतर उत्तर व पश्चिम महाराष्ट्र व पुढे कोकणात अशा सभा घेणार असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य करीत राज्यात जातीय विष कालवू नका, असे आवाहन केले. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना अनुल्लेखांनी मारत शहरातील आठ दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरदेखील बोट ठेवले.
४५ मिनिटांच्या सभेत ठाकरे यांनी इतिहासाचे दाखले देत संदर्भ सादर केले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांतील हवाला देत पवार यांच्यावर टीका करीत त्यांना ‘हिंदू’ या शब्दाची ॲलर्जी असल्याचा घणाघात केला. देवगिरी, पैठण या राजधान्या, खिलजीने केलेले अतिक्रमण, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना घेऊन निर्माण केलेले साम्राज्य यावर प्रकाश टाकून राज यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणावर टीका केली.