पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) सध्या दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. पुण्यात राज यांच्या हस्ते मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विविध विषयांवर भाष्य केले. राज यांनी सक्तवसुली संचालनालय(ED)च्या कार्यपद्धतीवर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनाही टोला लगावला. माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी बाहेर काढेन, असे खडसे म्हणाले होते. खडसे सीडी कधी बाहेर काढतात, मी त्याचीच वाट पाहत असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. तसेच, काँग्रेसच्या कार्यकाळातही तेच झाले होते आणि आता भाजपही तेच करत आहे, असेही राज म्हणाले. तसेच, ईडीसारखी मोठी सरकारी यंत्रणा सरकारच्या हातातले बाहुले झाले आहे. त्यामुळे खरे गुन्हेगार मोकाट राहतात, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
मराठा, ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य आहे तर अडलं कुठं?यावेळी राज यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. मराठा आणि ओबीसी आरक्षण सर्वांनाच मान्य असेल तर अडलय कुठंय?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, आरक्षणाच्या मुद्द्यावरून तरुणांची माथे भडकावून फक्त राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी केली. मागे मराठा मोर्चा निघाला होता. त्यावेळी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जाऊन मोर्चेकऱ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सर्वांना आरक्षण मान्य होते. जर सर्वांनाच आरक्षण मान्य होतं तर अडकलं कुठे? की केवळ इश्यू करायचा आहे?, असा सवाल राज यांनी केला.