ठाणे : ‘
प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन घरात केले पाहिजे. महाराष्ट्रात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत; परंतु राज्याच्या गृह खात्याने सर्व मौलवींना बोलावून मशिदींवरील भोंगे ईदपूर्वी ३ मेपर्यंत उतरवायला भाग पाडावे. तसे झाले नाही तर जेथे भोंगे सुरू असतील तेथे हनुमान चालीसा वाजवली जाईल. माझ्या भात्यात आणखीही बाण आहेत. मला ते बाहेर काढायला लावू नका,’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी येथे दिला.
ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर मेळाव्यात बोलताना मशिदीवरील भोंगे काढण्याचे आवाहन करताना हनुमान चालीसा वाजविण्याचे आव्हान दिले होते. आपल्या त्या भाषणावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी व माध्यमांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याकरिता ठाकरे यांनी ठाण्यात जाहीर सभेचे आयोजन केले होते. ठाकरे यांनी त्यांच्या मंगळवारच्या भाषणात पवार व राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेला लक्ष्य केले नाही.
राज म्हणाले की, ‘यापूर्वी वेळोवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबत आपण भूमिका घेतली आहे. नमाज पढण्यासाठी रस्ते, फुटपाथ अडवणे व बारा महिने लाऊडस्पीकर लावण्यास आपला विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकर लावू नये, असे मत व्यक्त केले आहे; परंतु मतांकरिता निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अन्यथा अन्य धर्मीयांना कसा त्रास होतो, ते हनुमान चालीसा लावून दाखवावे लागेल.’
तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील माझे भाषण मनात ठेऊन अनेक जण आले होते. यावेळी मी मोदींवर टीका न केल्याने त्यांनी माझे भाषण भाजपने तयार केल्याची टीका केली, असेही ते म्हणाले.काय म्हणाले, राज ठाकरे?१. शरद पवार खूश झाले की, भीती वाटते. आज पवार संजय राऊत यांच्यावर खूश आहेत. कधी टांगलेला दिसेल ते कळणार नाही.२. सुप्रिया सुळे यांचे खायचे दात आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत.३. राष्ट्रवादी काँग्रेस हा निवडून येणाऱ्या आमदारांची मोळी आहे व त्याची रश्शी पवार हे आहेत. ही माणसे दुसऱ्या पक्षात गेली, तरी निवडून येतील.४. माझा ताफा काही चुटुरपुटूर संघटना अडविणार, याची माहिती इंटलिजन्सला समजली, पण एसटी कर्मचारी शरद पवार यांच्या घरावर चालून जाणार, हे इंटलिजन्सला कसे समजले नाही?५. समान नागरी कायदा व लोकसंख्या नियंत्रण कायदा करा, ही माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी आहे.६. जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा कायम नागाने फणा काढल्यासारखा असतो, शेपटाला धरून गरगर फिरवेन आणि कुठे फेकेन ते समजणार नाही.७. ईडीच्या नोटिशीमुळे मोदींवरील टीकेचा ट्रॅक बदलणारा मी नाही. मला नोटीस आल्यावर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात गेलो होतो. नोटीस कायदेशीर असो की राजकीय, मी भीक घालत नाही.
जयंत पाटील यांचा उल्लेख ‘जंत पाटील’ व ‘चकीत चंदू’ असा करीत राज म्हणाले की, मनसे हा विझलेला नव्हे, तर समोरच्यांना विझवत जाणारा पक्ष आहे. भुजबळ तुम्हाला मोदींवर टीका केल्यामुळे नव्हे, तर तुमच्या गैरव्यवहारांमुळे तुरुंगात जावे लागले. शरद पवार यांनी खरेतर जातीपातींमधील भेदाभेद गाडले पाहिजेत; परंतु राजकीय स्वार्थासाठी ते जातीयवादाला खतपाणी घालत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतरच मराठ्यांच्या वेगवेगळ्या संघटना १९९९ नंतर कशा अस्तित्वात आल्या. मुस्लीम मतांसाठी पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत. सुप्रिया सुळे व अजित पवार एकत्र राहतात, पण अजित पवारांच्या घरी रेड पडते. तरीही मोदींशी पवार यांचे मधुर संबंध कसे? - राज ठाकरे