ठाणे : ‘राज तिलक की करो तैयारी आ रहे हे भगवाधारी... चलो अयोध्या..’ असा मजकूर लिहिलेले फलक सध्या ठाण्याच्या विविध भागांत मनसेकडून लावण्यात आले आहेत. मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीपासून ते अयोध्येला जाण्यापर्यंत विविध योजना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केल्या आहेत. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आता येणाऱ्या महापालिका व पुढील विधानसभा निवडणुकीत आपली वाटचाल असेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. अंगावर भगवी शाल परिधान केलेल्या राज यांच्या बॅनरवरील फोटोमुळे ठाणेकरांना ३५ वर्षांपूर्वीच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण होत आहे.
भगवी शाल अंगावर परिधान केलेल्या राज यांच्या फोटोमुळे ठाणेकरांच्या १९८७ सालातील जुन्या आठवणी जागृत झाल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यावेळी ठाण्यात आले असता, अशीच भगवी शाल परिधान करून त्यांचा सन्मान केला गेला होता. राज यांचा फोटो त्या फोटोशी साधर्म्य असणारा आहे, असे जुने शिवसैनिक खासगीत सांगत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज यांनी केलेल्या भाषणाचा एक व्हिडिओ गेले काही दिवस व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते केंद्र सरकारमधील मंडळींना देशात जातीय दंगे घडवून आणायचे असल्याचा दावा करीत असून, हिंदू व मराठी मुसलमान यांनी अशा कपटी डावपेचांपासून सावध रहावे, पोलिसांनी सतर्क रहावे, असे आवाहन करीत आहेत. याउपर कुणी दंगे घडवण्याचा प्रयत्न केल्यास मी आहेच, असा इशारा देताना दिसतात. या भूमिकेपासून पूर्णपणे फारकत घेऊन गुढीपाडव्याच्या दिवशी राज यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा मुद्दा उपस्थित केला. ठाण्यातील उत्तर सभेत त्यांचे स्वागत करताना त्यांना भगवी शाल पांघरायला दिली. राज यांच्या उजव्या खांद्यावरून शाल डाव्या खांद्यावर घातली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही ठाण्यात असेच भगवी शाल देऊन स्वागत केले जात होते. लागलीच त्याच भगव्या शालीतील फोटोंसह राज यांची पोस्टर्स ठाण्यात लागली. राज यांची ही हिंदुत्ववादी भूमिका व हा नवा लूक ठाण्यात प्रभावी ठरेल, असा विश्वास मनसैनिक व्यक्त करीत आहेत. शिवसेना हिंदुत्ववादापासून दूर गेल्याने नाराज व अस्वस्थ असलेला शिवसैनिक हाही राज यांच्यासोबत येईल, असे मनसेच्या नेत्यांना वाटते.
हिंदुत्ववादी भूमिकेमुळे आलेख उंचावणार का?यापूर्वी मनसेने मराठीचा मुद्दा उचलला होता. दुकानावरील मराठी पाट्यांकरिता आंदोलने केली. मात्र, ठाण्यात मनसेला मोठे राजकीय यश मिळाले नाही. २००७ मध्ये त्यांचे तीन नगरसेवक विजयी झाले. मनसेचे १२ आमदार २००९ मध्ये विजयी झाले तेव्हा रमेश पाटील हे एकमेव आमदार ठाणे जिल्ह्यातून विजयी झाले. २०१२ मध्ये मनसेचे सात नगरसेवक ठाण्यात विजयी झाले. मात्र, त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली. आता हिंदुत्ववादी भूमिका मनसेचा राजकीय आलेख उंचावेल, अशी पक्षाला अपेक्षा आहे.