मुंबई-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या प्रश्नावरुन सुरू केलेल्या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात ते चर्चेचा विषय ठरले आहेत. तसंच राज्यात तीन जाहीर सभांनंतर आता राज ठाकरे पुणे दौऱ्यावर जाणार असून पक्ष कार्यकर्त्यांसोबत जोर बैठका ते घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राज ठाकरेंना एक खोचक सल्ला दिला आहे. "राज ठाकरे हे स्वत: एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यात कुठेही जाऊन ते त्यांचा पक्ष वाढवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे. पण दुसऱ्या पक्षाचं ऐकून राज ठाकरे भाषण करत असतील तर त्यांनी स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये. त्यांची ओरिजिनॅलिटी कुठेतरी हरवत चालली आहे. ती त्यांनी जपली पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं", असं रोहित पवार म्हणाले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १४ मे रोजीच्या बीकेसी येथील जाहीर सभेत राज ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर सडकून टीका केली होती. राज ठाकरेंचा उल्लेख यावेळी मुन्नाभाई असा केला होता. त्याबाबत रोहित पवार यांना विचारण्यात आलं असता त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानाचं समर्थन केलं. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: त्यांचे बंधू आहेत. आमच्यापेक्षा जास्त त्यांच्या जवळचे राहिले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांना जास्त गोष्टी माहित असाव्यात. त्यामुळेच त्यांनी तसं विधान केलेलं असावं. ते त्यांचं व्यक्तिगत विधान आहे", असं रोहित पवार म्हणाले.
राजकारणाचा स्तर आधीच खालावलाय, भाजपावर टीकापुण्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीचा देखील रोहित पवार यांनी निषेध व्यक्त केला आहे. याप्रकरणी ट्विट करत रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने राजकारणाचा स्तर आधीच घालवलाय आता किमान महाराष्ट्राची संस्कृती तरी घालवू नये, असे म्हणत या मारहाण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
काल पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे 'अमित शाह आणि भाजपाची वाटचाल' या मराठीत अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईविरोधात आंदोलन करत स्मृती इराणी यांचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन सुरु झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घटनास्थळी येत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.