पंढरपूर-
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना एक सल्ला देऊ केला आहे. "महाराष्ट्रात भाजपाला आणण्यात शिवसेनाच जबाबदार असून पुन्हा पक्षवाढीच्या नावाखाली भाजपाने शिवसेनेला संपवण्याचा प्रकार सुरु केला. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपसोबत जवळीक वाढवत असल्याने त्यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा," असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. ते पंढरपुरात बोलत होते.
कर्जत-जामखेडमधील वारकऱ्यांसाठी पंढरपुरात भक्तनिवास उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी रोहित पवार उपस्थित होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी भाजपावर जोरदार टीका केली तसेच राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावरही आपलं मत व्यक्त केलं. "भाजपा सूड भावनेनं कारवाई करत आहे हे जगजाहीर आहे. संजय राऊतांवर केलेल्या कारवाईनंतर ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे", असं रोहित पवार म्हणाले.
राज ठाकरेंनी जपून पावलं टाकावीत- रोहित पवार"राज ठाकरे आता जातीय तेढ निर्माण करणारी भाजपाची भाषा बोलू लागले आहेत. पण भाजपाने आजवर त्यांच्या जवळ आलेल्या नेत्याला किंवा पक्षाला संपवण्याचं काम केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी जरा जपून पावलं टाकावीत. पक्ष वाढविण्याच्या नावाखाली त्यांनी शिवसेनाला संपवण्याचा प्रकार सुरू केला. राज यांनी शिवसेनाच्या इतिहासाचा एकदा अभ्यास करावा", असं रोहित पवार म्हणाले.