Hindi Language in Maharashtra: राज्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी सक्तीची करण्यात आली होती. राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४नुसार पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार होती. मात्र आता सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली. या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत आपले मत मांडले.
राज ठाकरे ट्विटमध्ये म्हणाले...
महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन. सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती... ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केलं, पण ते करताना कधी दुसऱ्या प्रांतावर मराठी लादली नाही, त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचं होतं? असो, ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झालं. पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोकं उभे राहिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन, अशी भावना राज ठाकरेंनी व्यक्त केली.
मराठी माणूस जर असाच भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणाऱ्यांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे आणि राहील फक्त यावेळेस दाखवलेली एकजूट कायम दिसू दे. सरकरने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आलं, पण ठीक आहे निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद... पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार, असे राज यांनी ठणकावून सांगितले.