Raj Thackeray, Chaitya Bhoomi : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सभा घेत आहेत. या सभांमध्ये ते राज्यातील राजकारणावर भाष्य करताना दिसले आहेत. नुकत्याच झालेल्या एका सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवार हे शाहू-फुले-आंबेडकर यांचे नाव घेतात, पण छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत नाही, असा थेट आरोपच राज यांनी त्यांच्यावर केला होता. त्यास शरद पवार यांनी सूचक उत्तर दिलेच. पण आज या आरोपावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही उत्तर दिले. तसेच, राज ठाकरेंनाही एक प्रश्न विचारला.
"राज ठाकरे असा आरोप करताना दिसले की शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही. मला याबाबत असं विचारावंसं वाटतंय की राज ठाकरे यांचं घर मुंबईत आहे. ते स्वत: चैत्यभूमीपासून अगदी जवळ सुमारे पाच मिनिटांच्या अंतरावर राहतात. मग असे असूनही ते आजवर चैत्यभूमीवर का गेले नाहीत? ते शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत?", असा थेट सवाल जितेंद्र आव्हाड यांनी राज यांना केला.
आव्हाड यांनी आपल्या भाषणात इतिहास सांगण्याबाबतचा मुद्दाही समाविष्ट केला. "राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहिजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास सांगून आणि तो तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न होणार असेल तर आम्ही कधीही ते यशस्वी होऊ देणार नाही", असे इशारा त्यांनी दिला.
"युवा पिढीला चुकीचा इतिहास सांगू नका. इतिहासावर मी कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे. वर्तमान इतिहासकारांनाही हे संदर्भ माहीत आहेत. त्यामुळे एक लक्षात घ्या की इतिहास हा असा कुणाच्याही नावावर खपवता येत नाही. चुकीचा इतिहास सांगू नका. मुद्दामहून अपप्रचार करुन महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत. असं करून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केलात, तर आम्ही तुमचे प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही", असेही आव्हाड यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.