Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कायम कोणत्याही विषयावर अतिशय सडेतोड मत मांडत असतात. आज मराठी भाषा गौर दिनानिमित्त राज ठाकरे यांची नवी मुंबईत एक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत राज यांनी विविध विषयांवर भाष्य केले. केवळ राजकारणच नव्हे तर मराठी भाषा, साहित्य अशा विषयांवर त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले. याच वेळी एका राजकीय विषयावर भाष्य करताना त्यांनी अस्सल ठाकरी शैलीत विधान केले.
काही दिवसांपूर्वी शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे पक्षचिन्ह अशा दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गटाला देण्याचा निर्णय राष्ट्रीय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानंतर ठाकरे गट आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी या निर्णयावर टीका केली. ठाकरे गटाने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती, पण कोर्टाने निवडणूक आयोग योग्य असल्याचेच म्हटले. मनसेकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केल्यानंतर, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील कधीही मनसे या पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगू शकतात, असे मीम्स व्हायरल झाले होते. या विषयावर राज ठाकरेंनी रोखठोक मत मांडले.
"बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण करण्याचा कार्यक्रम विधानभवनात पार पडला. त्यावेळी उपस्थित लोकांमध्ये कोण कुठल्या पक्षाचे हेच कळत नव्हतं. एखादा माणूस समोरून येऊन म्हणायचा- साहेब, नमस्कार, मी आमदार आहे... तेव्हा मला विचारावं लागायचं- कुठला? मग पुढे मी विचाराचयो की, हल्ली तो एखादा आमदार काय करतो? मग त्यावर मला ते लोक सांगायचे की- तो आमदार आता दुसऱ्या पक्षात गेला. मला आता आमच्या राजू पाटीलना विचारायचं आहे की, (तुम्ही पक्षाची जबाबदारी) घेता का? एकदा हातात घेऊन बघा, मग आमचं काय जळतं ते कळेल तुम्हाला... आम्ही दिवस-रात्र बरनॉल लावत असतो," अशा शब्दांत राज ठाकरेंनी खिल्ली उडवणाऱ्यांना सुनावलं.