मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन मुंबईत होत आहे. या अधिवेशनात मनसेने पक्षाचा जुना झेंडा बदलून त्याऐवजी राजमुद्रा असलेल्या भगव्या झेंड्याचे अनावरण केले आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाच्या दिशेने जाणार असल्याचे स्पष्ट संकेत असल्याचे बोलले जात होते. मात्र, मनसेचा झेंडा का बदलला, याबाबत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
2006 मध्ये मनसे पक्ष स्थापन केला. तेव्हा माझ्या मनात जो झेंडा होता. तो हा होता. संयुक्त महाराष्ट्र समितीचा झेंडा भगवा होता, हा झेंडा मनामध्ये होता. स्थापनेच्या वेळेस अनेकजण आले म्हणाले की, झेंड्यात हिरवा रंग असू दे, सोशल इंजिनिअरिंगच्या कल्पना माझ्यासमोर मांडल्या गेल्या. पण, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊनच हिंदवी स्वराज्य उभारले होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरेंनी झेंड्याचा रंग बदलला म्हणजे राज ठाकरे बदलला असं होत नाही. मी तोच आहे जो पूर्वी होतो, माझी मतं तीच आहेत. जी पूर्वीपासून आहे. रंग बदलून सरकारमध्ये जाणारा राज ठाकरे नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
माझ्या डोक्यातून हा झेंडा जात नव्हता, त्यामुळे शिवजयंती, गुढीपाडवा दरम्यान आम्ही झेंडा काढतो, बदललेल्या परिस्थितीमुळे हा झेंडा काढला हा निव्वळ योगायोग, माझा मूळ डीएनए हाच आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. याचबरोबर, ही राजमुद्रा आहे, हा झेंडा कुठेही पडता कामा नये. निवडणुकांच्या वेळी राजमुद्रा असलेला झेंडा वापरायचा नाही. त्याऐवजी दुसरा पक्षाचे चिन्ह असलेला झेंडा वापरायचा, असे राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
दरम्यान, मनसेच्या राजकीय वाटचालीत प्रथमच दिवसभराचे राज्यस्तरीय महाअधिवेशन होत असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करुनच आपला अजेंडा स्पष्ट केला. तसेच, मराठी आणि हिंदू याबद्दलही राज यांनी स्पष्टीकरण दिले. यावेळी मी हिंदू आहे, मी मराठी आहे मी धर्म बदललेला नाही, असे म्हणत राज यांनी मराठीचा मुद्दा आहेच, असे ठणकावले.