मुंबईत राज्यभरातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनसेचे पदाधिकारी सुस्तावले आहेत, त्यांच्या डोक्यात निवडणुकांचे वारे सुरु आहे, असा समाचार घेतला. तसेच अनंतचतुर्थीनंतर मी राज्याच्या दौऱ्यावर येणार आहे, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. याचवेळी राज यांनी पदाधिकाऱ्यांवर दोन मोठ्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत.
राज्यात दिवाळीनंतर कधीही निवडणुका लागू शकतात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कधीही निवडणूक लागेल. निवडणूक आयोगानुसार दर चार वर्षांनी पक्षाला सदस्य नोंदणी करावी लागते. यंदा मोठ्या प्रमाणावर सदस्यनोंदणी होणार आहे. त्यामुळे आपणही लोकापर्यंत जास्त वेगाने पोहोचायला हवे, मनसे देखील लवकरच सदस्य नोंदणी अभियान सुरु करेल असे राज ठाकरे म्हणाले. शिवसेना-शिंदे गटामध्ये स्पर्धा असल्याने त्याचा फायदा घेण्याचे संकेत राज ठाकरें यांनी याद्वारे दिले आहेत.
तर गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी, चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लागले पाहिजेत. ते कसे असावेत, काय काय असावे हे तुम्हाला कळविले जाईल. परंतू, मला ते सर्वत्र दिसायला हवेत असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. पक्षातील उणीदुणी चव्हाट्यावर न येण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्यातील वाद सोशल मीडियावर पोस्ट करून नयेत असा दम भरला आहे.
याचबरोबर राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना हायवेवरून प्रवास करताना सांभाळून वाहने चालविण्याचे आवाहन केले आहे. घरी तुमची सारे वाट पाहत असतील, असेही ते म्हणाले.
पेशव्यांनी कधी स्वत:ला छत्रपती म्हटले नाही...राजकारणात येण्यासाठी मी राज्यातील जनतेला पत्र लिहिणार आहे, असेही राज ठाकरे म्हणाले. आपल्याच महाराष्ट्रात आपल्याच महापुरुषांचे प्रत्येक जात वाभाडे काढत आहे. तुम्हाला वेगवेगळे ठेवायचे आहे. वारसा हा विचारांचा असतो, वास्तूचा नसतो. पेशव्यांच्या हाती संपूर्ण सत्ता होती, पण त्यांनी स्वत:ला कधीही छत्रपती म्हणवून घेतले नाही. आम्ही नोकर, छत्रपती तेच आहेत. आम्ही फक्त विचार पोहोचवतोय, असे सांगत राज ठाकरेंनी मी बाळासाहेबांचे विचार पोहोचवत आहे असे म्हटले.