मुंबई - राज्यातील भोंग्यांचा मुद्दा हा सामाजिक आहे. धार्मिक नाही. सणासुदीच्या वेळी, सभेसाठी, एखाद्या काही कारणासाठी ठीक आहे. पण वर्षभरासाठी नाही. तुम्हाला कुणाला ऐकवायचे आहे. आम्हाला नाही ऐकायचे. या भोंग्यांमुळे, आजारी माणसांना महिलांना, लहाण मुलांना विद्यार्थ्यांना त्रस होतो. एवढेही समजत नाही, असे म्हणत, माणुसकीपेक्षा यांचा धर्म मोठा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, हा विषय केवळ मशिदींसाठीचाच नाही तर, मंदिरांवरील भोंगेही खाली आले पाहिजे. ज्या-ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होईल, ते-ते बंद झाले पाहीजे. विश्वास नांगरे पाटील यांचा मला फोन आला होता. त्यांनी सांगितले, की एवढे अर्ज आले होते. एवढ्यांना परवानगी दिली. पण, महाराष्ट्रातील बहुतांश मशिदी या अनधिकृत आहेत. म्हणजेच त्यावरील भोंगेही अनधिकृतच, मग त्यावर भोंगे लावण्यासाठी सरकार अधिकृत परवानगी कसे देऊ शकते. हे समजण्या पलिकडे आहे. अशी परवानगी कशी दिली जाऊ शकते, असेही राज म्हणाले. एवढेच नाही, तर आम्हाला देताना तुम्ही एक दिवसाची, दहा दिवसांची परवानगी देणार. मग त्यांना वर्षाची परवानगी कशी दिली जाते? असा सवालही राज यांनी यावेळी केला.
भोंग्यांचा मुद्दा सामाजिक आहे. पण ते त्यांच्या धर्माला घट्ट राहणार असतील, तर आम्हालाही तेवढेच घट्ट व्हावे लागेल. ज्या मशिदींवर सकाळी अजान झाली नाही. त्यांनी पुढेही न्यायालयाच्या आदेशानुसारच ठरलेल्या डेसीबलमध्येच अजान द्यावी. एवढेच नाही, तर दिवसभरातल्या अजानही त्याच आवाजात दिल्या गेल्या पाहिजे. अन्यथा हनुमान चालिसा चालणार. आम्हालाही महाराष्ट्रात शांतताच हवी आहे. पण त्यांनी धार्मिक वळण द्यायचा विचार केला, तर आम्हीही धार्मिक वळण देऊ, असेही राज म्हणाले.
हा विषय जोवर निकाली लागत नाही, तोवर हा मुद्दा कायम राहणार. हा प्रश्न केवळ सकाळच्या अजानपुरता नाही. हा विषय दिवसभराचा आहे. जर भोंग्यांचा वापर केला गेला, तर आमचे लोकही त्या-त्या वेळेवर हणुमान चालिसा वाजवणार. एवढेच नाही, तर हा विषय एक दिवसाचा नाही, मी महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांनाही हेच सांगतो, की जिकडे मौलवी ऐकत नाहीत, भोंगे मोठ्या आवाजात वाजतील, तिकडे डबल आवाजात हणुमान चालिसा लावा, असेही राज म्हणाले.