Raj Thackeray reaction Shiv Sena Symbol: उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या द्वंद्वामध्ये शनिवारी दोन्ही गटांना धक्का बसला. खरी शिवसेना कोणाची... ठाकरेंची की शिंदेंची? याचा फैसला निवडणूक आयोगाकडे होणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागले आहे. तशातच, अंधेरीची विधानसभा पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला होणार असून त्यासाठी १० तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि नाव कोण वापरणार यावर अनेकविध चर्चांना उधाण आले होते. तशातच, शनिवारी निवडणूक आयोगाने हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात गोठवले. तसेच शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. या निर्णयानंतर नेतेमंडळींकडून विविध प्रतिक्रिया येत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना वॉर्निंग दिली आहे.
शिवसेना हे नाव तसेच धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गटांना वापरता येणार नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नव्या चिन्हासाठी आणि नव्या नावासाठी उद्या दुपारी १ वाजेपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे. याचदरम्यान, राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली असून त्यात मनसैनिकांना तंबी दिली आहे. "सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन," असे स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी लिहिले आहे.
दरम्यान, उद्या दुपारी १ वाजेपर्यंत शिंदे आणि ठाकरे गटांना आपले नवे चिन्ह आणि नवे नाव निवडणूक आयोगाला द्यायचे आहे. ठाकरे गटाकडून तीन चिन्हे आणि तीन नावे असा पर्याय आयोगाला देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी नावांचे आणि निवडणूक चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. पक्षाच्या चिन्हासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन चिन्हांचे पर्याय ठाकरे गटाकडून देण्यात आले आहेत. तर, पक्षाच्या नावांसाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा तीन नावांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे देण्यात आला आहे. यापैकी एक नाव आणि एक चिन्ह लवकरात लवकर आम्हाला देण्यात यावे जेणेकरून आम्हाला जनतेच्या दरबारात जाता येईल, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी केली आहे.