पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले दोन दिवस भलतेच ट्रोल होत आहेत. 'ढगाळ वातावरण असल्यानं पाकिस्तानच्या रडारमध्ये आपण दिसणार नाही', असं आपण एअर स्ट्राईकदरम्यान वायुसेनेला सुचवल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यावरून ते नेटिझन्सच्या 'रडार'वरच आहेत. हे ट्रोलिंग सुरू असतानाच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज मोदींची खिल्ली उडवली.
'आज सकाळी युनायटेड नेशन्समध्ये एक ठराव झाल्याचं मला कळलंय. या ठरावानुसार असं ठरलंय की, ज्याला कुणाला युद्ध करायचं असेल, त्याने पावसाळ्यात करावं. पाऊस मधे येईल, ढगही येतील, त्यामुळे रडारमध्ये काही येणार नाही, तुमचं काम होईल आणि त्या देशाला कळणारही नाही कुणी बॉम्ब टाकला ते. या शोधाचे मूळ शास्त्रज्ञ आहेत, ते आपले पंतप्रधान...', असा जोक सांगत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान केलं. 'एअरफोर्सने काय करायचं हे पंतप्रधान ठरवणार... अरे, काय चाललंय काय... थट्टा लावलीय?... देशाचं हसं होतंय बाहेर या असल्या गोष्टींमुळे... असंही त्यांनी सुनावलं.
'ए लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदी सरकारवर 'व्हिडीओ स्ट्राईक' करण्याची धडक मोहीमच राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उघडली होती. वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेऊन त्यांनी मोदी-शहांना पाडण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्या योजना कशा फोल होत्या, हे व्हिडीओद्वारे दाखवून सरकारची पोलखोल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. पुलवामा हल्ल्याबाबतही संशय व्यक्त करत, मोदी जवानांच्या हौताम्त्याचं राजकारण करत असल्याचा आरोप राज यांनी केला होता. त्यांच्या या सभांचा निकालावर कसा परिणाम होतो, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
काय म्हणाले होते मोदी?
'बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अचानक हवामान खराब झाले. त्यामुळे अशा स्थितीत भारतीय वैमानिक पाकिस्तान सीमेत दाखल होतील का, अशी शंका होती. त्यातच शास्त्रज्ञांनी सर्जिकल स्ट्राईकची तारीख बदलण्यास सांगितले. मात्र माझ्या डोक्यात दोन विषय होते, एक म्हणजे गुप्तता आणि दुसरी म्हणजे आपण काही फार मोठे वैज्ञानिक नाही. मात्र त्यानंतर मी म्हणालो की, एवढ्या मोठ्या प्रमाणात आभाळ आणि पाऊस असेल तर त्याचा आपल्याला लाभही होऊ शकतो. त्यामुळे आपण पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाही. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल, असं मी सांगितलं. त्यामुळे सगळेच द्विधा मनःस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेलं आहे, चला पुढे जाऊ या...'
नेटिझन्स सुस्साट, हास्याची लाट!
पंतप्रधान मोदी यांच्या या अजब शोधानंतर सोशल मीडियावर 'गजब' जोक फिरत आहेत. काँग्रेस समर्थक विरुद्ध मोदी समर्थक यांच्यात शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळतंय. #CloudyModi हा हॅशटॅग वापरून मोदीविरोधक त्यांची खिल्ली उडवताहेत, तर #DeshModiKeSaath या हॅशटॅगमधून भाजपा समर्थक मोदींना पाठिंबा देत आहेत.