मुंबई – सामना अग्रलेखात जी भाषा वापरण्यात आलीय ती थर्डक्लास आहे आणि ही भाषाही थर्डक्लासच माणूस वापरू शकतो. प्रत्येक चॅनेलवर शिवीगाळ करण्याची भाषा वापरली जाते. खालच्या पातळीची भाषा वापरताय. त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावा लागणार. संजय राऊतांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेस निरोधासारखा करतेय आणि करत राहणार अशी घणाघाती टीका मनसेचे नेते संतोष धुरी यांनी केली आहे.
संतोष धुरी म्हणाले की, राज ठाकरे जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन केले जाईल. गृहमंत्री आज जी बैठक घेतायेत ते चांगले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, अनाधिकृत भोंगे काढावे असे आदेश सरकार देईल अशी अपेक्षा आहे. कायदा सुव्यवस्था पाळायची असेल तर अनाधिकृत भोंगे हटवावे लागतील. मनसे कार्यकर्त्यांना सभा घेण्यापूर्वीपासून नोटिसा देण्यात येत आहे. निर्बंध घातले जात आहे. हनुमान चालीसा, महाआरती म्हणू शकत नाही. आम्ही पाकिस्तानात राहतोय का? चुकीचं चाललं असेल तर त्यावर बोलू शकत नाही का? असा सवाल त्यांनी केला.
सामना अग्रलेखात काय म्हंटलं?
महाराष्ट्रात दोन राजकीय पक्षांच्या सभांतून वेगळे काही मिळाले काय? संभाजीनगरात भाजपच्या उपवस्त्राने सांगितले, ‘मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, नाही तर आम्ही थांबणार नाही.’ उपवस्त्रांना आता उत्तर प्रदेशच्या प्रेमाचे जे अजीर्ण झाले आहे ते गमतीशीर आहे. आधी त्यांना उत्तर प्रदेश व तेथील लोक नजरेसमोर नको होते. हिंदी पट्टय़ातील लोक हिंदुस्थानात राहायलाच लायक नाहीत, असेच त्यांचे म्हणणे होते. योगी आदित्यनाथ यांना कळत नाही. डोक्याचा तुळतुळीत गोटा केलेला एक माणूस भगवे कपडे घालून फिरतोय. हे किळसवाणे असल्याचे त्यांचे मत होते. आता अचानक हा ‘गोटा’ त्यांना प्रिय झाला व हिंदी भाषिक मंडळींना चुचकारण्याचे काम सुरू झाले. हे मतपरिवर्तन झाले त्यामागे नक्की कोणता व्यवहार आहे ते पाहावे लागेल असा टोला राज ठाकरेंना नाव न घेता लगावला होता.
राज ठाकरेंना अटक करणार?
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यावरून आक्रमक इशारा दिला. त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणची सीसीटीव्हीची तपासणी पूर्ण झाली आहे. या तपासणीचा अहवाल पोलीस महासंचालक रजनी शेठ यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. यात राज ठाकरेंनी सभेला घातलेल्या अटी-शर्थींचे उल्लंघन केल्याचं म्हटलं आहे. आज पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
४ मे पासून मनसेच्या आंदोलनाला सुरुवात होईल. आज रमजान ईद असल्यामुळे आणि राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे राज ठाकरेंच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. राज ठाकरेंनी औरंगाबादमधील सभेतही भोंग्यांबाबतची आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर आज अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून राज्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण अचानक राज ठाकरेंनी काल पत्रक जारी करुन आजचा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. तसंच भोंग्यांबाबतच्या निर्णयावर आपली भूमिका आज जाहीर करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर सकाळी नऊ वाजता मनसेच्या महत्वाच्या नेत्यांसोबत राज ठाकरे 'शिवतीर्थ'वर बैठक घेत आहेत. त्यानंतर ते आपली भूमिका जाहीर करणार आहेत.