मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकीकडे शिवसेनेला गळती लागली आहे तर मनसेनेही याच संधीचा फायदा घेत राज्यभरात पक्ष संघटना वाढीवर भर दिला आहे. अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने समोर आणला आहे. शिवसेनेने भाजपाला धक्का देत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. त्यानंतर राज्यात नवी आघाडी जन्माला आली. त्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मविआ सरकारमध्ये शिवसेनेची कोंडी होऊ लागली.
शिवसेनेची ही परिस्थिती पाहता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा झेंडा आणि अजेंडा दोन्ही बदलले. बाळासाहेब ठाकरे जयंतीच्यादिवशी मनसेने आक्रमक हिंदुत्वाची भूमिका स्वीकारली. त्यानंतर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेने शिवसेनेवर कुरघोडी केली. राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेने त्यांच्याकडील १ मत विधानसभेत शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने दिले होते. मध्यंतरी राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर पुन्हा राज ठाकरे मैदानात उतरले आहेत.
गणेशोत्सवानंतर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत. त्यात राज ठाकरे यांनी मुंबई, पुणे, नाशिक प्रमाणेच आता विदर्भातही पक्षवाढीवर भर दिला आहे. विदर्भात शिवसेनेचा मतदार हा सहजासहजी भाजपाला मतदान करणार नाही. या परिस्थितीत शिवसेनेवर नाराज असलेल्या मतदाराला मनसेकडे वळवण्याचा राज ठाकरेंना प्रयत्न आहे. विदर्भात एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शिवसेनेची ताकद कमी करण्यात भाजपाला यश आले आहे. आता राज ठाकरे हे १३ सप्टेंबरला नागपूर जिल्हा दौऱ्यावर जाणार असून याठिकाणी ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे.
राज्यात भाजपा-मनसे युतीचं नवीन समीकरण? गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा नेत्यांची मनसे प्रमुख राज ठाकरेंशी जवळीक वाढली आहे. सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी गेले होते. त्यापूर्वीही फडणवीसांनी राज ठाकरेंनी भेट घेतली होती. फडणवीसांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. त्यामुळे राज्यात भाजपा-मनसे युतीचं नवीन समीकरण पाहायला मिळणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे.