Raj Thackeray Speech In MNS Melava: राज ठाकरे वारंवार भूमिका बदलतात असा आरोप काही माध्यमातून जाणीवपूर्वक पसरवला जातो. काही पत्रकार राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले असून ते न्यूज चॅनेल, वृत्तपत्रातून काही गोष्टी छापून आणतात. माझ्याबद्दल काय पसरवलं जातंय की मी मोदींना पाठींबा दिला, पुढे विरोध केला आणि माझ्यामागे ईडी लावली म्हणून पुन्हा मोदींना पाठींबा दिला. त्या ईडी प्रकरणावर आज मी बोलणार आहे. महाराजांची शपथ घेऊन सांगतो जे सांगतोय ते खरं आहे असं सांगत राज ठाकरेंनी ईडी नोटिशीवर पहिल्यांदा खुलासा केला.
मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की, व्यवसाय करणे हे पाप तर नाही ना..? अनेकांना व्यवसाय दाखवता येत नाही पण त्यांचं सुरू असते. २००५ साली वर्तमान पत्रात मी बातमी वाचली. त्यात केंद्र सरकारच्या एनटीएससीच्या मिल्स विकून कामगारांचे पगार देऊन टाका असं सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे. त्यात एक कोहिनूर मिल होती. ती बातमी वाचता वाचता मी पार्टनरशी चर्चा केली. एका सहकाऱ्याला बोलावून चर्चा केली. सगळ्यांनी चर्चा करून टेंडर भरून टाकले. एकेदिवशी माझ्या पार्टनरचा घाबरत घाबरत फोन आला आणि टेंडर लागले असं सांगितले. ४००-५०० कोटींचे टेंडर इतका पैसा आणायचा कुठून तेव्हा माझीही पायाखालची जमीन सरकली असं त्यांनी सांगितले.
त्यानंतर आमच्या एका पार्टनरने आयएल अँड एफएस कंपनीशी बोलणे केले. ही कंपनी आम्ही पैसे भरायला तयार आहोत असं बोलले. त्यानंतर ते सगळे पैसे त्या कंपनीने भरले. आम्ही त्यात ७-८ पार्टनर होतो. त्यानंतर पुन्हा कोर्ट प्रकरण सुरू झाले. वर्ष- दीड वर्ष त्यात गेले. त्या दरम्यान हा पांढरा हत्ती आहे आपल्याला झेपायचं नाही म्हणून माझ्यासोबत काही पार्टनरने यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला. २००८ साली आमचा हिस्सा विकून आम्ही बाहेर काढू. त्यानंतर हे प्रकरण संपले असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, पुढे जेव्हा मला ईडीची नोटीस आली, मला कळलं नाही की नक्की काय घडलं, त्यात कोहिनूरचा विषय होता. याच्याशी आपला संबंध काय, मला बोलवले तेव्हा ती माणसं काय बोलत होती हेच मला समजेना. जे पैसे आम्हाला मिळाले त्यावर आम्ही टॅक्स भरून विषय संपला होता. आम्ही बाहेर पडलो मग इतक्या वर्षांनी नोटिस आली तेव्हा सीएला बोलावलं. तेव्हा आमच्यातील एका पार्टनरने टॅक्सचे पैसे भरलेच नाही हे पैसे बाहेरच्या बाहेर वापरले हे समोर आले. मग त्यानंतर कटकट नको म्हणून पुन्हा आम्ही आपापला टॅक्स भरला. राज ठाकरेचे व्यवहार इतके स्वच्छ असतात, तो ईडीला घाबरेल? असं राज यांनी सांगितले.
डोक्यावर तलवार घेऊन फिरत नाही
एवढ्या गोष्टीसाठी राज ठाकरे मोदींना घाबरला आणि त्यांची स्तुती करायला लागला...मला त्याच्याशी काय देणे घेणे. माझ्या डोक्यावर तलवार घेऊन मी फिरत नाही. बाकींच्यासारखे नाही. ४ दिवस आधी म्हणाले होते ७०,००० कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना जेलमध्ये टाकू, त्यानंतर मोदींनी त्यांना जेलच्या ऐवजी डायरेक्ट मंत्री मंडळात घेतलं. आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे पहिल्यांदा कळले असा खोचक टोला राज यांनी भाजपाला लगावला.