मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर निवडणुका जिंकता येत नाहीत, याचा साक्षात्कार झाल्यानंतर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आता आपले थोरले चुलत बंधू उद्धव यांच्या पावलावर पाऊल टाकत हिंदुत्वाची कास धरण्याचा मनोमन निश्चय केलेला दिसतो. गुरुवारी एका महाविद्यालयात केलेल्या भाषणात तसे संकेतही त्यांनी दिले.रुईया महाविद्यालयातील जाहिरात व पत्रकारिता विभागातर्फे आयोजित ‘कलाकारण’ या कार्यक्रमात राज यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हिंदुत्ववादाबाबत तुमचा स्टॅण्ड काय आहे, असा थेट प्रश्न आल्यानंतर ते म्हणाले, मी हिंदू आहे. मी काही धर्मांतर केलेले नाही. त्यामुळे हिंदुत्वासाठी उभा राहणारच. काही वर्षांपूर्वी आझाद मैदान येथे रझा अकादमीने मोर्चा काढला होता तेव्हा मीच विरोध केला होता, असे उत्तर त्यांनी दिले. मनसेच्या झेंड्यातील हिरवा रंग भारताला मानणाऱ्या मुसलमानांसाठी आहे. भिवंडी आणि बेहराम पाड्यासाठी नाही. अमजद अली खान सरोद वाजवतात किंवा झाकीर हुुसैन तबला वाजवितात तेव्हा मी त्यांच्याकडे मुस्लीम म्हणून पाहत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
राज ठाकरे हिंदुत्वाच्या ट्रॅकवर!
By admin | Published: January 08, 2016 2:48 AM