Raj Thackeray Vs Ajit Pawar : 'अजित पवार पुण्यात नसतानाही येथील धरणं भरली आहेत', अशी बोचरी टीका मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली होती. त्या टीकेला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) चे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर सुपारीबहाद्दर असल्याचा पलटवार केला होता. त्या टीकेनंतर आज मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोडअकोल्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विरोधात मनसेचे कार्यकर्ते आक्रम झाले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा करणारे अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. मात्र, पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखल्यामुळे मोठा संगर्ष टळला. दरम्यान, या घटनेनंतर आता मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
हल्ल्यानंतर मिटकरींची प्रतिक्रियाया घटनेनंतर अमोल मिटकरींनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, 'अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अशा हल्लांना आम्ही भीक घालत नाही. ते नपूसंक आहेत, असे मागून हल्ले करुन काही होणार नाही. ही गुंडगिरी महाराष्ट्रात चालणार नाही. मी याप्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली आहे. असं करुन महायुतीत सत्तेत येऊ शकतो, असं त्यांना वाटत असेल, तर तसं कधीही होणार नाही,' असं मिटकरी म्हणाले.
मनसे नेत्याकडून मिटकरींचा 'घासलेट चोर' उल्लेखअमोल मिटकरींच्या टीकेनंतर मनसे नेते गजानन काळे यांनी मिटकरी आणि अजित पवारांवर पलटवार केला. '70 हजार कोटीचा घोटाळा करुन नुसते पान सुपारी नाही, तर महाराष्ट्राला चुना लावला अजित दादांनी(हे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत). तरी घासलेट चोर वर तोंड करुन आम्हाला सुपारीबाज बोलतोय... अजित दादांच्या घरातल्या सदस्यांना एकदा नव्हे तर दोनदा निवडणुकीत पराभूत व्हावे लागले आणि कसल्या राजसाहेब ठाकरे यांच्या यश अपयशाच्या बाता मारतो रे घासलेट चोर ...??? हिम्मत असेल तर स्वतः चा पक्ष काढून 2 आमदार निवडून आणावेत तुमच्या दादांनी…!!! मग जाहीर मिशी कापून तुझ्या हातात देवू ... उगाच पवार साहेबांचा पक्ष चोरून रेघोट्या मारू नका... पक्ष चोरून पण 1 खासदार निवडून आणताना दमछाक झाली तुमच्या दादांची (ते सुनील तटकरे पण स्वतःच्या हिम्मतीवर आले) टी शर्टवर पेन लावणारा पावसाळी बेडूक मटणकरी कुठला ...आम्हाला शिकवायचं नाय, लायकीत राहायचं, लायकीत !!!' अशी घणाघाती टीका काळे यांनी केली.
नेमका वाद काय?राज ठाकरे यांनी सोमवारी(दि.29) पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांवर बोचरी टीका केली होती. पुण्यातील पावसाचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले की, अजित पवार पुण्यात नसूनही पुण्यातील धरणं भरली आहेत. यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंचा थेट सुपारीबाज असा उल्लेख केला. टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारीबहाद्दरांनी अजित पवारांवर बोलू नये. हे सुपारी बहाद्दर टोल नाका, भोंगा किंवा आणखी कुठल्याही आंदोलनाला यशस्वी झाले नाही. राज ठाकरेंची विश्वासार्हता संपली आहे, अशी टीका मिटकरींनी केली होती. त्या टीकेनंतर मनसैनिक खुप नाराज झाले होते.