बीड - मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर तसेच औरंगाबादमधील भाषणानंतर त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिराळा येथील कोर्टाने राज ठाकरेंविरोधात वॉरंट जारी केल्यानंतर आता बीडमधील परळी कोर्टानेही राज ठाकरेंविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. २००८ मध्ये मराठी पाट्या आणि मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनावरून दाखल गुन्ह्या प्रकरणात कोर्टाने हे वॉरंट बजावले आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी २००८ मध्ये मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर राज्यात आक्रमक आंदोलने झाली होती. तेव्हा झालेल्या आंदोलनांप्रकरणी विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. त्यातीलच एका १४ वर्षे जुन्या प्रकरणात बीडमधील परळी येथील कोर्टाने राज ठाकरेंविरोधात हे अजामिनपात्र वॉरंट जारी केले आहे. या संदर्भात कारवाईसाठी कोर्टाने मुंबई पोलिसांना पत्रही पाठवले आहे.
जामीन घेतल्यानंतरही सतत कोर्टामध्ये गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हा आदेश दिला आहे.. यापूर्वी १० फेब्रुवारीला कोर्टाने अटक वॉरंट काढले होते आणि १३ एप्रिल पर्यंत कोर्टात हजर राण्या संदर्भात सांगितले होते मात्र राज ठाकरे हे १३ एप्रिलपर्यंत कोर्टात हजर न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा परळी कोर्टाने राज ठाकरे यांना अटक वॉरंट काढले आहे
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी त्यांचे वकील आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे.
राज ठाकरे यांनी हनुमान चालीसा पठणाच्या वक्तव्यानं समाजातील सर्व स्तरावर शांतता भंग झाली असून राज्याच्या विविध भागात दंगलसदृश्य वातावरण निर्माण झालेलं आहे. राज्यातील धार्मिक वातावरण बिघडवणार्या, प्रक्षोभक भाषणं करणार्या राज ठाकरेंच्या पत्रकार परिषद, राजकीय दौरे, राज्यातील विविध शहरांच्या भेटींच्या कार्यक्रमांवर तुर्तास बंदी घालण्याची मागणीही याचिकेत केली गेली आहे. आगामी शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.