नागपूर - राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचा कुणी प्रयत्न केला तर आम्ही पूर्ण तयारीत आहोत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेत आहोत. कुठल्याही कृतीमुळे समाजात तेढ निर्माण होणार नाही अशी कृती कुणी करू नये. अशी कृती कुणी केल्यास मग ती संघटना असो वा व्यक्ती असो त्याच्यावर कारवाई होइलच असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी दिला आहे.
राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या वादावरून गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे. राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठकी घ्यावी, अशा सूचना पोलीस महासंचालक यांना गृहमंत्र्यांनी दिल्या आहेत. पोलिसांनी कुठलाही निर्णय घेताना त्याची परिणामकता तपासून घ्यावी. या बैठकीनंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन मग अंतिम निर्णय घेऊ असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी ३ मे पर्यंतची मुदत दिली आहे. या मुदतीनंतर राज्यात दंगली होतील का? असे गृहमंत्र्यांना विचारले असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात दंगली होतील असे काही वातावरण नाही. मात्र पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. देशात काही राज्यात दंगे झाले आहेत. महाराष्ट्रातही तसे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. पण, महाराष्ट्रात पोलीस तयारीत आहेत. जे कुणी असा प्रयत्न करत असतील त्यांना जशास तसे उत्तर देऊ. देशासमोर महागाई, सीमा सुरक्षा असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अशी अशांतता काही घटक निर्माण करत आहेत. हे घटक कोण आहे ते पोलीस तपासात समोर येईल असंही त्यांनी सांगितले.
आमचे हात बांधलेले नाहीत
मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेप्रमुखराज ठाकरे(MNS Raj Thackeray) यांनी आघाडी उघडली आहे. ज्या मशिदींमधून भोंग्यावर नमाज आणि अजान म्हटली जाते, तिच्यासमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा वाजवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, भोंग्यांवरून झालेल्या वादानंतर पीएफआय संघटनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी दिली आहे. पीएफआयचे मुंब्य्रातील अध्यक्ष मतीन शेखानी यांनी ही धमकी दिली आहे. देशामध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाटेला आलात तर सोडणार नाही हा आमचा नारा आहे, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर राज ठाकरेंनीही या धमकीला प्रत्युत्तर देत आमचेही हात बांधलेले नाहीत, तुम्ही जी शस्त्र घ्याल ती आम्हाला हाती घ्यायची वेळ आणू नका असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.