मनसे आणि उद्धव ठाकरे गट शिवसेना हे एकत्र येत असल्याचा चर्चा सुरु असतानाच अचानक राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी गुरुवारी संजय राऊत यांची भेट घेतली होती. यानंतर राऊत मातोश्रीवर तर पानसे कृष्णकुंजवर गेले होते. पानसे यांनी वैयक्तिक भेट असल्याचे म्हटले होते. परंतू, आज राऊत यांनी मनसेसोबत युतीवर उद्धव ठाकरेंशी काल चर्चा झाल्याचे सांगितले होते.
यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अशी चर्चा सुरु होती. तसेच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. परंतू, आज वेगळेच घडत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आले आहे. वर्षा बंगल्यावर ही पूर्वनियोजित भेट असल्याचे सांगितले जात आहे. वैयक्तिक कामासाठी राज ठाकरे आल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदेंनी केलेले बंड शमत नाही तोच अजित पवारांनी राजकीय धुळवड उडवून दिलेली आहे. ज्य़ा अजित पवारांच्या नावे खडे फोडून शिंदे गट बाहेर पडलेला त्याच पवारांना सत्तेत सोबत घेतल्याने राजकीय समीकरणे वर्षभरातच बदललेली आहेत. आता पुढील वर्षभरासाठी काय काय राजकीय समीकरणे बदलतात याबाबत कोणीही काहीही सांगू शकत नाहीय, अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.