नाशिक - Raj Thackeray on Maratha Reservation ( Marathi News ) महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी जातीचे विष पसरवलं जात आहे. जरांगे पाटील उपोषणाला बसले, मी गेलो होतो त्यांच्यासमोर सांगितले हे होणार नाही. होणार नाही याचा अर्थ होऊ नये असं नाही. तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नव्हते. मागे इतके मोर्चे निघाले पुढे काय झाले? महाराष्ट्रातील माझ्या मराठा बांधवांना विनंती आहे. यांच्या भूलथापांना बळी पडू नका, जी गोष्ट होऊ शकत नाही ती आश्वासने हे लोक देतायेत असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा समाजाला दिले आहे.
नाशिकच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरे म्हणाले की, आज मूळ प्रश्न शिक्षण, नोकरीचा आहे. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण, नोकरी देऊ शकत नाही. बाहेरचे लोक आमच्या राज्यात पोसायचे आणि आपल्याकडील लोक आंदोलन करतात. राज्यातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण, रोजगार देणे हे सहजपणे शक्य आहे. परंतु तुम्ही मराठी म्हणून एकत्र राहू नये, महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून वेगवेगळ्या जातीत विष कालवायचे. मराठा झाल्यावर ओबीसी, त्यानंतर वेगवेगळे, तुमची जेवढी मते विभागली जातील ते या लोकांसाठी फायद्याची आहेत. तुम्ही मराठी म्हणून एकत्र यायला नको म्हणून तुमच्यात विष कालवण्याचे जे धंदे आहेत ते ओळखा असंही त्यांनी सांगितले.
तसेच हा फक्त महाराष्ट्रातील मराठा समाजाचा विषय नाही तर प्रत्येक राज्यातील तिथल्या समाजाचा विषय आहे. एका जातीचा विषय कोर्टात गेला तर या देशातील प्रत्येक जाती उभ्या राहतील आणि आरक्षणाचा विषय अख्ख्या देशात पेटेल, जे होऊ शकत नाही, जे सुप्रीम कोर्टात होऊ शकत नाही. त्यासाठी लोकसभेचे अधिवेशन घ्यावे लागेल. कधीतरी वकिलांशी बोला, मी खोटे सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल बोललो होतो. हा पुतळा उभा राहू शकत नाही हे मी बोललो होतो. इथं समुद्रात उभं करायचे असेल तर भरणी टाकावी लागेल. भरणी टाकून स्मारक करायचे असेल तर किमान २५-३० हजार कोटी लागतील असं राज ठाकरेंनी म्हटलं.
दरम्यान, शिवछत्रपतींचे खरी स्मारके हे गडकिल्ले आहेत. भविष्यातील पिढ्यांना आपण पुतळे दाखवणार आहोत? आमच्या राजाचे मोठेपण, कर्तृत्व, यश हे गडकिल्ल्यात आहेत. पूर्वी होते तसे गडकिल्ले झाले तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकतो. आज किती वर्ष अरबी समुद्रातील पुतळा उभारायचा आहे हे सांगतायेत, एवढ्या वर्षात वल्लभभाई पटेलांचा पुतळा झाला. हा पुतळा समुद्रात उभा राहू शकत नाही. ज्याप्रकारे भूलथापा देऊन जातीजातीत विष कालावून तुमच्याकडून मते घेतात, त्यानंतर तुमची प्रतारणा करतात हे तुम्ही ओळखणे गरजेचे आहे असंही राज ठाकरेंनी सांगितले.
सर्व जातींना एकत्र घेऊन महाराष्ट्र घडवूया
आज १८ वा वर्धापन दिन आहे. आपण एक शपथ घेऊया.. जे जे काही शक्य असेल ते ते मी या महाराष्ट्रासाठी करेन. जे शक्य असेल ते हिंदुंसाठी, हिंदू समाजासाठी आणि मराठी माणसांसाठी करेन. आत्ताचे राजकारण हे अळवावरचं पाणी आहे त्यातून हाताला काही लागणार नाही. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. जो महाराष्ट्र पूर्वी होता तो महाराष्ट्र उभा करायचा आहे. मला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कुणी कुणालाही जातीने पाहिलेले चालणार नाही. शिवछत्रपतींचे नाव घ्यायचे आणि जातीजातीत भेद करायचे? सर्व जातींनी एकत्र येऊन महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न आपण पाहूया. निवडणुकीचे काय निर्णय घ्यायचे हे लवकरच सांगेन, तोपर्यंत संयम ठेवा असंही राज ठाकरे यांनी सांगितले आहे.