ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आसामच्या महिला शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी आसामच्या महिला शिष्टमंडळाने उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत असल्याची समस्या राज ठाकरे यांच्यासमोर मांडली. तसेच, या समस्येवर मार्गदर्शन करण्याची विनंती राज ठाकरे यांना केली.
दादरमधील "कृष्णकुंज" या राज ठाकरेंच्या निवासस्थानी आसामच्या महिलांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली. आसाममधील "स्वाधीन स्त्री शक्ती" असे या महिला संघटनेचे नाव आहे. महाराष्ट्राप्रमाणेच आसाममध्येही उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नागरिकांचा लोंढा वाढत आहे. त्यामुळे तेथील भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांवर गदा येत आहे. त्यामुळे या समस्येवर मार्गदर्शन करण्याची विनंती यावेळी आसामच्या या महिला शिष्टमंडळाने राज ठाकरेंना केली. तसेच, यावेळी या महिलांनी राज ठाकरेंना राखीही बांधली. त्याचबरोबर, सप्टेंबर महिन्यात आसामला भेट देऊन "आसाम बचाओ आंदोलना"ला पाठिंबा द्यावा, अशी विनंती सुद्धा या महिलांनी यावेळी राज ठाकरे यांना केली.
महाराष्ट्रात गेली 11 वर्षे राज ठाकरे मराठी अस्मिता आणि स्थानिक रोजगारावरील मराठी माणसाच्या न्याय-हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहेत. या प्रश्नावर राज हेच नेतृत्व आणि मार्गदर्शन देऊ शकतात याची खात्री आम्हाला वाटत असल्याचे मत यावेळी शिष्टमंडळाने व्यक्त केले.
#SwadhinNariShakti संघटनेच्या प्रतिनिधींनी आसामी भाषेची, संस्कृतीची सुरु असलेली गळचेपी, घुसखोरी अशा समस्यांबाबत मनसेअध्यक्षांची भेट घेतली. pic.twitter.com/rCvTNFsG3Z— MNS Adhikrut (@mnsadhikrut) July 14, 2017