नाशिक - Raj Thackeray in Nashik ( Marathi News ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आज मनसेचा वर्धापन दिन कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर राज ठाकरे आणि कुटुंबाने काळाराम मंदिरात दर्शन घेत आरती केली. राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यामुळे संपूर्ण शहरात बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यासोबत कार्यकर्त्यांमध्येही उत्साह आहे.
काळाराम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका शाखेच्या उद्घाटनासाठी जात होते. त्यावेळी वाटेतच राज ठाकरेंचा ताफा १५ मिनिटे थांबला होता. सातपूर येथील ही घटना आहे. शाखेच्या उद्घाटनाला जाताना रस्त्यातच अचानक राज ठाकरेंचा ताफा थांबल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. तब्बल १५ मिनिटे हा ताफा तिथेच होता. राज ठाकरेंना एक महत्त्वाचा फोन आला होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता हा फोन कुणाचा आणि ताफा वाटेतच अचानक का थांबवण्यात आला हे मात्र गुलदस्त्यात आहे.
आगामी लोकसभेसाठी मनसे निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उतरवणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी संघटना बळकटीकरणासाठी राज विविध ठिकाणी दौऱ्यावर फिरत आहेत. नाशिकमध्येही राज ठाकरेंनी वेगवेगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली तेव्हापासून मुंबई-पुणे आणि नाशिकमध्ये त्यांचा प्रभाव अधिक आहे. नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या मनसेचे ३ आमदार निवडून आले होते. त्याचसोबत मनसेला महापालिकेत पहिली सत्ता नाशिकने दिली होती.
दरम्यान, मनसेच्या आजच्या वर्धापन दिनानिमित्त दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी ९ वाजल्यापासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पदाधिकाऱ्यांच्या भेटीही राज ठाकरे घेत आहेत. राज्याच्या विविध भागातून पदाधिकारी, कार्यकर्ते नाशिक शहरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राज ठाकरे आजच्या सभेत लोकसभा निवडणुकीविषयी काय बोलणार, आज मनसेच्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर होणार का हे पाहणे गरजेचे आहे.