जालना – जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात सुरु असलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यात अनेक आंदोलक जखमी झाले. यावेळी पोलिसांनी गोळीबारही केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे. जालनातील या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी जालना येथे जात आंदोलकांची भेट घेतली. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनराजे यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जालनात जाऊन आंदोलकांची भेट घेतली.
छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून राज ठाकरे जालनाच्या दिशेने निघाले. तेव्हा वाटेतच मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा ताफा अडवला. आंदोलनाला पाठिंबा द्यावा अशी त्यांची मागणी होती. तेव्हा राज ठाकरे थेट कारमधून उतरले आणि म्हणाले की, या राजकारण्यांच्या विनाकारण नादी लागू नका. या घोषणांनी तुम्हा सगळ्यांना वेडे केले आणि रस्त्यावर आणले. या लोकांना तुमची फक्ते मते पाहिजेत. तुमच्यासाठी काही करायचे नाही. मला जे काही बोलायचे ते मी आंदोलनस्थळी बोलेन. तुम्ही सगळे तिथे या असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगताच आंदोलकांनी मनसे, राज ठाकरे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
राज ठाकरेंची आंदोलनस्थळी भेट
आंदोलनकर्त्यांनी राज यांचा ताफा सोडल्यानंतर ते अंतरवाली सराटी या गावात पोहचले. त्याठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेत राज ठाकरे यांनी म्हटलं की, मी तुमच्यासमोर भाषण करायला नाही तर विनंती करायला आलोय. ज्या लोकांनी तुमच्यावर काठ्या उचलायला सांगितल्या, ज्यांनी गोळीबारी करायला सांगितली त्या सर्वांना आधी मराठवाडा बंदी करून टाका. केलेल्या गोष्टीची माफी मागत नाही तोवर कुणालाही पाऊल ठेवायला लावू नका. झालेल्या गोष्टीचे राजकारण करू नये असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, तुम्ही विरोधात असता तर काय केले असते? असा सवाल राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना विचारला.
दरम्यान, माता भगिनींवर ज्या काठ्या बसत होत्या, त्या मला बगवले नाही. मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या सर्व गोष्टी कानावर घालीनच. मागे मोर्चे निघत होते तेव्हाही मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही हे मी सांगितले होते. हे सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतील. मते पाडून घेतील आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. हा सुप्रीम कोर्टातला तिढा आहे. थोड्या गोष्टी कायद्यानेही समजून घ्या. आरक्षणाचे आमिष दाखवून तुमचा वापर करणार. विरोधी पक्षात मोर्चा काढतात आणि सत्तेत आल्यानंतर तुमच्यावर गोळ्या झाडणार. पोलिसांना दोष देऊ नका, पोलिसांना ज्यांनी आदेश दिलेत त्यांना दोष द्या. सतत आरक्षणाचे राजकारण करायचे. मते पदरात पाडून घ्यायची. मते मिळाली त्यानंतर तुम्हाला वाऱ्यावर सोडून द्यायचे अशी टीका राज यांनी केली.