कल्याण - Raj Thackeray on Sharad pawar ( Marathi News ) आपल्याकडचे महापुरुष जातीमध्ये विभागून टाकलेत. महापुरुषावरील राजकारण सध्या सुरू आहे. त्यामुळे कधीही छत्रपतींचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवारांवर निशाणा साधला.
शरद पवार गटाच्या नव्या चिन्हाचं लॉन्चिंग रायगडावर केले त्याबाबत पत्रकारांनी राज यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, तुतारी चिन्ह मिळालं मग फुंका, मी काय करू त्याचं? जर तुम्हाला आठवत असेल तर मी मुलाखतीतही शरद पवारांना प्रश्न विचारला होता. तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर नाव घेता पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही. कारण शिवछत्रपतींचे नाव घेतले तर मुस्लिमांची मते जातात अशा संभ्रमावस्थेत त्यांनी इतकी वर्ष काढली आणि आता त्यांना काहीतरी आठवलं असं राज ठाकरेंनी सांगितले.
तसेच महाराष्ट्राचा जो राजकीय विचका झालेला आहे. त्याबद्दल कुणी माध्यमांना सांगितले होते का? झाल्यावर कळाले. महिनाभरावर निवडणूक आलीय त्यामुळे काही काळ संयम ठेवा. महाराष्ट्रात अनेक तरुण तरुणी भविष्यात राजकारणात येऊ इच्छितात. त्यांच्यासमोर हे राजकारण दाखवणार का? टेलिव्हिजनवर जी भाषा वापरली जाते त्यामुळे येणाऱ्या वर्गाला हेच राजकारण आहे असं वाटतं. या सर्व गोष्टीचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने घेणे गरजेचे आहे. जर लोकांनी वठणीवर आणलं नाही तर काहीच होणार नाही. महाराष्ट्रासमोरचे मूळ विषय बाजूला सारले जातात. फेब्रुवारी महिना सुरू आहे. राज्यात दुष्काळाचा प्रश्न आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे. या सर्व गोष्टींवरून लक्ष विचलित करण्यासाठी जातीचा आधार घेतला जातो. माझ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना याच महाराष्ट्रात उत्तम शिक्षण, नोकरी मिळायला हवी. महाराष्ट्र सगळ्यात श्रीमंत राज्य आहे. या राज्यात असा टाहो फोडला जात असेल तर हे कुणीतरी करवतंय हे लक्षात का येत नाही. इतर राज्यात या गोष्टी का होत नाही? संपूर्ण महाराष्ट्र विस्कळीत करणे जे कुणाचं ध्येय असेल आणि राज्य त्याला बळी पडत असेल तर हे दुर्दैव आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं.
जनतेनं वठणीवर आणणं गरजेचे
लोकसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुरू आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण या मतदारसंघाचा आढावा घेतला. २०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात चिखल झालाय. मी विधानसभेत गेलो होतो, समोर बसलेले लोक कुठल्या पक्षात आहेत हेच कळत नव्हते. पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक मला भेटले. त्यांना विचारले कुठल्या राष्ट्रवादीचे आहात? त्यातले २ जण मी अजितदादा, तर इतर बोलले आम्ही शरद पवार गटाचे. याप्रकारे वातावरण राज्यात मी कधीही पाहिले नाही. लोकांनी वठणीवर आणायला हवं. लोकांनी वठणीवर आणले नाही आणि आपण करतोय ते योग्य असं त्यांना वाटत राहिले तर राज्यात आणखी चिखल होणार. या गोष्टी पूर्ववत करायच्या असतील तर जनतेने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. केवळ एका व्यक्तीच्या नावाने खालचा बेस तयार होत राहिला तर हे पोषक वातावरण नाही असं आवाहनही राज ठाकरेंनी जनतेला केले.
गणपत गायकवाडांनी टोकाची भूमिका का घेतली याची चौकशी करा
आमदार गणपत गायकवाड इतक्या टोकाला जाऊन गोळीबार का करेल, त्या माणसाची मानसिक स्थिती अशी का झाली, ती कुणी आणली यामागे सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करण्याइतपत का भूमिका घेतली ते कोर्टात उघड होईलच अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी कल्याणच्या गोळीबार प्रकरणावर दिली.
...मग आपल्याकडेच EVM वर मतदान का?
मी आधी बोलतो ते नंतर पटतं, मी मराठा आरक्षणाबाबत जे म्हटलं, त्याचं काय झालं? मी ज्या गोष्टी बोलतो त्या नीट विचार करून बोलतो. घडणाऱ्या गोष्टींचे होणारे परिणाम आधी सांगतो, त्यावेळी अनेकांना पटत नाही परंतु कालांतराने त्या गोष्टी तुम्हाला पटतात. जगभर सगळ्या पुढारलेल्या देशात शिक्क्यावर मतदान केले जाते मग आपणच का ईव्हीएम घेऊन बसलोय, मी ज्याला मतदान केले त्याला ते मिळाले का हे कळत नाही. मध्यंतरी स्लीप येत होत्या पण त्या व्हिव्हिपॅटही सगळ्या ठिकाणी नाही. मी पहिल्यांदा यावर बोललो तेव्हा अनेकांनी माझ्यावर टीका केली होती असा टोला राज ठाकरे यांनी टीकाकारांना लगावला.
राज्यात राष्ट्रीय पक्ष नको, राज्यातीलच पक्ष हवे
मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यायचा हे बोलतोय, इतकी वर्ष हा लढा सुरू आहे. मराठी भाषेचा अभिमान असणारे किती राजकारणी आहेत, त्यांना देणे घेणे नाही. अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काय दिलं असं विचारणारे लोक आपल्याकडे आहेत. मी नेहमी सांगतो, राज्याराज्यात राष्ट्रीय पक्षांची गरज नसते. तिथे राज्यातले पक्ष पाहिजेत. राज्यातील पक्षच अशाप्रकारे दबाव आणू शकतात आणि त्यानंतरच या गोष्टी होतात असं राज ठाकरे यांनी सांगितले.
निवडणूक आयोग ५ वर्ष काय करतं?
निवडणूक आयोग ५ वर्ष काय काम करते, तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा उभी करता येत नाही का? निवडणुकीसाठी शिक्षक वैगेरे कामाला जुंपले जातात. शाळा संपल्यानंतर शिक्षकांना कामाला लावणार आहेत असं काही निर्णय घेणार आहेत असं कळतं, तुम्ही करून बघा. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक असतात. त्यांना इतर कामे काय लावता? असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी विचारला.