दिंडोशी येथील एका कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलाखत घेतली जाणार होती. पाऊस आणि सरकार कधी कोसळतील याचा नेम नाही, असा टोला लगावत राज ठाकरे यांनी पावसात मुलाखत देण्यास नकार दिला. एकीकडे शरद पवार, देवेंद्र फडणवीसांनी भर पावसात भाषणे दिली असताना राज ठाकरेंनी पावसामुळे मुलाखत देण्यास नकार देण्यामागचे कारणही सांगितले आहे.
इकडे शरद पवार नवी मुंबईत, तिकडे फडणवीस मुंबईतील पावसात भिजले; भाषण नाही थांबवले...
गोरेगावमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुंबई आणि उपनगरांत पावसाने धुमाकूळ घातला होता. राज ठाकरे या कार्यक्रमालाही आले होते. परंतू, त्यांनी तिथे जमलेल्या नागरिकांना संबोधित करताना पाऊस सुरु असल्याने मी मुलाखत देण्यास इच्छुक नाही, असे स्पष्ट केले.
राज ठाकरे हे स्पष्टवक्ते आहेत. त्यांनी व्यासपीठावर छप्पर आहे, परंतू तुमच्या डोक्यावर नाहीय. अशा परिस्थितीत मी मुलाखत देऊ इच्छित नाही. आयोजकांना मी माझ्या डोक्यावरचे छप्पर काढता येईल का हे देखील विचारले. परंतू, ते आता शक्यही नाहीय. याच महिन्याची पुढील तारीख निवडून मी मुलाखतीसाठी परत येईन, हा माझा शब्द आहे. पाऊस असूनही मी मुद्दाम तुमच्या समोर आलो, मला तुम्हाला भेटायचे होते, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.