मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाआघाडीत जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. मात्र मनसेला लोकसभा निवडणूक लढण्यात रस नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकीनंतर ही माहिती समोर आली. मोदी सरकारवर मनसे कडाडून टीका करेल. मात्र लोकसभा निवडणुकीत आम्हाला रस नाही. विधानसभा निवडणुकीत आम्ही ताकद दाखवू, अशी माहिती मनसेच्या एका वरिष्ठ नेत्यानं दिली. मनसेला महाआघाडीत घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र मनसेला महाआघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध होता. तरीही राष्ट्रवादीनं आपल्या कोट्यातील कल्याणची जागा मनसेला सोडण्याची तयारी दर्शवल्याचं वृत्त होतं. यासाठी राष्ट्रवादीनं काँग्रेसलादेखील गळ घातली होती. मात्र आता मनसे लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसे विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचंदेखील सूत्रांनी सांगितलं.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमात एकत्र होते. त्यावेळी राज यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर या दोन नेत्यांमधील जवळीक कायम चर्चेत राहिली. यानंतर मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीनं जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र काँग्रेसनं मनसेला सोबत घेण्यास कायम विरोध दर्शवला. महाराष्ट्रात मनसेला सोबत घेतल्यास त्याचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेशात बसेल, अशी भीती पक्षाच्या नेत्यांनी वरिष्ठांकडे व्यक्त केली. मनसेची उत्तर भारतीयांच्या विरोधातली भूमिका पक्षासाठी अडचणीची ठरू शकते. काँग्रेसला होणारं उत्तर भारतीय मतदान कमी होऊ शकतं, अशी भूमिका राज्यातील काँग्रेस नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे मांडली होती.
लोकसभा निवडणूक लढवण्यात रस नाही; राज ठाकरेंची 'मनसे' इच्छा?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 1:54 PM